आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.९-वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे ५ ते ७ जानेवारी दरम्यान कांताई सभागृहात १६ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पहिल्यांदाच महोत्सवाची सुरवात मुंबई येथील पूजा गायतोंडे यांच्या सुफी व गझल गायनाने होणार असल्याची माहिती शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चांदोरकर यांनी दिली.
यावेळी चांदोरकर प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, विनायक टेंभूर्णे, दिनेश तायडे आदी उपस्थित होते. महोत्सवाचे उदघाटन ५ रोजी जैन उद्योग समुहाचे अशोक जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर ललित कोल्हे, एम.व्यंकटेश आदी उपस्थित राहणार आहेत. यावर्षी प्रतिष्ठानतर्फे ३ ऐवजी ४ सत्रांमध्ये हा महोत्सव होणार आहे. तसेच ७ जानेवारी सकाळी ७ वाजता महात्मा गांधी उद्यानात महोत्सवाचे एक सत्र होणार आहे.
अंजली गायकवाडच्या मैफलीने येणार बहारसंगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुसºया सत्रात उज्जैन येथील अत्यंत होतकरु व उदयोन्मुख भगिनी संस्कृती व प्रकृती वहाने आपल्या संतूर व सतार जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तर दुसºया दिवशी पहिल्या सत्रात सारेगमप स्पर्धेची विजेती अंजली गायकवाड व नंदिनी गायकवाड या दोन्ही बहिणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व नाट्यगीतांची मैफल सादर करणार आहेत. दुसºया सत्रात नृत्यांगणा पंडिता शमाताई भाटे यांच्या शिष्या अमिरा पटवर्धन आपला कथ्थकचा नृत्याविष्कार सादर करतील.
‘इसराज’ या दुर्मिळ वाद्य वादनाची होणार मैफलतिसºया दिवशी सकाळी ७ वाजता महात्मा गांधी उद्यानात प्रख्यात शास्त्रीय उपशास्त्रीय गायक आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे यांची मैफल होणार आहे. तसेच यावर्षी इसराज या दुर्मिळ होत चाललेल्या वाद्याच्या वादनाची मैफल होणार आहे. या मैफलीत दिल्लीचे उस्ताद अर्शद खान ‘इसराज’ वादन करणार आहेत. दिलरुबा व सतीसारखे दिसणारे हे वाद्य खूप कमी वादक संपूर्ण भारतवर्षात वाजविताना दिसतात. संगीत महोत्सवाचा समारोप बनारस घराण्याचे प्रख्यात तबला वादक पंडित कालिनाथ मिश्रा व त्यांचे चिरंजीव सत्यप्रकाश मिश्रा यांच्या तबला जुगलबंदीने होणार आहे. महोत्सवाचे उदघाटन सूत्रसंचालन अभिनेत्री व निवेदक दिप्ती बर्वे-भागत या करणार आहेत.