लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : रावळगाव येथील एस.जे. शुगर यासाखर कारखान्याच्या या वर्षाच्या गळीत हंगामासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस दिला. याच उसाचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट थकल्याने शेतकरी हतबल झाले होते. बुधवारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अलिबाग येथे कारखान्याचे मालक आमदारजयंत पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. उसाचे पेमेंट न मिळाल्यास टोकाचा निर्णय घेऊ, अशी भूमिका या भेटीत आ. चव्हाण यांनी मांडल्यानंतर येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांचे थकलेले पेमेंट देण्याचे आमदार पाटील यांनी मान्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तालुका परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
रावळगावच्या साखर कारखान्याच्या २०२०-२०२१च्या गळीत हंगामासाठी तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस मोठ्या प्रमाणात दिला. मात्र गेल्या ५ महिन्यांपासून या शेकडो शेतकऱ्यांचे १५ कोटीहून अधिक रकमेचे पेमेंट थकीत होते. यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक आणि कारखान्याच्या प्रशासनाकडे पेमेंटची मागणी केली. मात्र पेमेंट मिळाले नाही. प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत होती. यामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले होते. पेमेंट थकल्याने खरीप हंगामासाठीही अडचण निर्माण झाल्या होत्या.
शेतकऱ्यांनी मांडली कैफियत
उसाचे पेमेंट मिळत नसल्याने हतबल झालेल्या ऊस शेतकऱ्यांनी आ. मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. चव्हाण यांनी आमदार जयंत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे, पेमेंटसाठी होणारी दिरंगाई याबाब चर्चा केली. यानंतरही पेमेंट मिळत नसल्याने शेवटी बुधवारी शेतकऱ्यांसह आ. चव्हाण यांनी कारखान्याचे मालक आ. जयंत पाटील यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी धडक दिली. पेमेंट मागणीचे निवेदनही दिले. चव्हाण यांच्यासोबत शेषराव पाटील, उद्धवराव माळी, भाजयुमोर्चाचे कपिल पाटील, रोहन सूर्यवशी, राम पाटील हेही उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आ. जयंत पाटील यांना चाळीसगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांची सद्य:स्थिती अवगत केली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उसाचे एकूण प्रलंबित पेमेंट व १८ टक्के व्याज यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना तातडीने देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असतानाही आजतागायत रावळगाव कारखान्याने देयके अदा केलेले नाही. कोरोना व टाळेबंदीमुळे शेतकरी अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे उसाची थकबाकी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. हे पेमेंट तातडीने द्या, अशी मागणीही केली. यावर जयंत पाटील यांनी स्वतः लक्ष घालून येत्या १५ दिवसात थकीत पेमेंट देण्याचे आश्वासित केले.
यावर्षी मी ३५० टन ऊस कोदगाव व परिसरातून रावळगाव कारखान्याला दिला. तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनीही ऊस दिला आहे. तथापि पाच महिने उलटूनही उसाचे पेमेंट मिळाले नाही. आमची व्यथा समजून घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रश्नात लक्ष घातले. अलिबाग येथे आमच्यासोबत येऊन कारखाना मालकाची भेट दिली. यामुळे पेमेंट मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
शेषराव पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, कोदगाव, ता. चाळीसगाव