जळगाव : अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने विजय प्रल्हाद शिनकर (४८, मुळ रा.वरणगाव, ता.भुसावळ) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे चार वाजता गुड्डूराजा नगराला लागून असलेल्या बी.जे.नगरात उघडकीस आली. ही घटना आत्महत्या आहे की तोल जावून पडल्याने मृत्यू हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.जे.नगरातील सिध्दांत अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर विजय शिनकर हे पत्नी कल्पना, मुलगी श्रध्दा व मुलगा सारंग असे चौघे वास्तव्याला होते. शिनकर हे वैद्यकिय प्रतिनिधी (एम.आर) म्हणून काम करायचे. दोन वर्षापूर्वीच ते वरणगाव येथून जळगावात स्थायिक झाले. सिध्दांत अपार्टमेंटमध्ये त्यांनी स्वत:चा फ्लॅट घेतलेला होता. शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पत्नी व दोन्ही मुलांशी त्यांनी गप्पा मारल्या. त्यानंतर सर्व जण झोपले. शनिवारी पहाटे चार वाजता मुलगा सारंग हा लघुशंकेसाठी उठला असता वडील जागेवर दिसले नाहीत. बाथरुमध्येही नसल्याने तो इमारतीच्या गच्चीवर बघायला गेला, तेथेही ते नव्हते. त्यामुळे त्याने बहिण श्रध्दा हिला उठवले व दोघं जण खाली आले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरड केली. पत्नी व शेजारच्या लोकांनी धाव घेऊन त्यांना तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
जळगावात इमारतीवरुन पडून वैद्यकिय प्रतिनिधीचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 3:14 PM