जळगाव : डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि शेतीतून खर्चही निघत नसल्याने नैराश्य आलेल्या छगन तोताराम महाजन (७८, रा.आडगाव, ता.एरंडोल) या शेतक-याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी आडगाव येथे घडली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन महाजन यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. ते फेडण्यासाठी कसरत होत होती.शेतीच्या उत्पन्नातून खर्चही निघत नाही. त्यामुळे महाजन अस्वस्थ होते. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांनी स्व:तला पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. ते ५४ टक्के भाजले होते, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.छगन महाजन यांच्याकडे पाच ते सात बिघे जमीन होती. यावर्षी त्यांनी कापूस लावला होता. मात्र पाऊस नसल्याने उत्पन्न अत्यल्प आले. त्यामुळे ते चिंचेत होते. पत्नीच्या नावाने आडगाव विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज माफ झाले होते. याशिवाय एरंडोल येथील खासगी बँकेचे घेतलेले कर्ज मुलांच्या नावावर होते. शेताचे कमी उत्पन्न आणि डोक्यावरील कर्जामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. यातच त्यांनी रविवारी दुपारी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. त्यांना दोन्ही मुले शेती करतात. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
एरंडोलला कर्जबाजारी शेतकऱ्याची पेटवून घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 11:46 PM