जळगाव- आत्महत्या करणे पाप आहे, पण मानसिक आजाराला मी कंटाळलोय असून आत्महत्या करीत आहे़ याला कुणालाही जबाबदार धरू नये, अशा आक्षयाची सुसाइड नोट लिहून पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरात जयेश रतन मोतीराया (वय-२४) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तीन महिन्यांपूर्वी वडीलांचे निधन झाल्यामुळे जयेश हा दांडेकर नगरातील पाण्याच्या टाकीजवळ आईसोबत राहत होता़ बी़एडपर्यंतचे शिक्षण पुर्ण झाल्यामुळे जयेश हा नोकरीच्या शोधार्थ होता. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून तो मानसिक आजारापासून त्रस्त होता़ त्यामुळे त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. मंगळवारी जयेशची आई या घराजवळ प्रवचनाला गेल्या होत्या़ त्यामुळे जयेश हा घरी एकटाच होता. त्यामुळे त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर मुलाने आत्महत्या केल्याचे पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. नंतर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. क्षणाचा विलंब न करता रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जयेश याला जिल्हा रूग्णालयात नेले. त्याठिकाणी तपासणीअंती जयेशला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाइड नोट लिहीली होती़ ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यात आत्महत्या करणे पाप आहे, पण मी मानसिक आजाराला कटाळलोय़ त्यामुळे मी आत्महत्या करीत असून कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेले होते.दीड वर्षापूर्वीही आत्महत्तेचा प्रयत्नजयेश याने दीड वर्षापूर्वी देखील रेल्वेसमोर उभे राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती नातेवाईकांनी दिली. सायंकाळी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेल्यानंतर नातेवाईकांनी त्याठिकाणी गर्दी झाली होती. नंतर याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयेश याच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी आहेत.
आत्महत्या करणे पाप,पण आजाराला कंटाळलोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:20 PM