दोघांना अटक : दोन भावंडांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रेम नगरात विनापरवानगी भरविण्यात आलेल्या बाजारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला शिवीगाळ करून आत्महत्येची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी श्याम आनंदचंद भोई (रा. खंडेराव नगर), आकाश शिवाजी गावंडे (रा. रामेश्वर काॅलनी) या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. तर सागर शिवाजी गावंडे (रा. रामेश्वर काॅलनी) हा फरार आहे.
दरम्यान, या तिघांसह इतर १५ जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडमुळे लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचीही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मनपाचे शिपाई भानुदास अंबर ठाकरे (३९, रा. दिनकर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत.