जळगाव : घरातील व्यक्तींना शौचालयाला जावून येतो सांगून घराबाहेर पडलेल्या तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्यापूर्वी आसोदा रेल्वे गेटजवळ घडली. समाधान मुलचंद कोळी (२८, रा. वाल्मिकनगर, आसोदा) असे मयत तरूणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी समाधान याने मोबाइलवर श्रद्धांजलीचे स्टेटस् ठेवले होेते. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समाधान कोळी हा चायनीज, बिर्याणी विक्रीची गाडी लावून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. शुक्रवारी सकाळी समाधान हा शौचालयाला जावून येतो असे सांगून दुचाकीवरून घराबाहेर पडला. त्यानंतर आसोदा रेल्वेगेट पासून काही अंतरावर असलेल्या खांबा क्रमांक ४२२/२९ ते ४२३/०१ च्या दरम्यान धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत त्याने आत्महत्या केली़
समाधानचा मृतदेह सापडला
बराच वेळा हाेवून सुध्दा समाधान हा घरी आला नाही, त्यामुळे कुटूंबियांसह त्याच्या मित्रांनी समाधान याचा शोध सुरू केला. अखेर आसोदा रेल्वेगेटजवळ दुचाकी आढळून आली. नंतर रूळावर चिन्नविछिन्न अवस्थेत समाधान याचा मृतदेह दिसून येताच, कुटुंबीयांनी आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी साहेबराव पाटील व विलास शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला होता. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तसेच सकाळी समाधान याने स्वत:च्या मोबाईलच्या स्टेट्सला भावपूर्ण श्रध्दांजली असेही स्टेट्स ठेवले असल्याची माहिती पोलिसांना गावातील तरूणांनी दिली. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीनीला सुध्दा फोन करून तुला असोद्यात यावे लागेल असे सांगितले हाेते.