जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे हितेंद्र विलास महाजन (वय २२) या तरुण अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे तीन वाजता उघडकीस आली. नोकरी लागत नसल्याच्या नैराश्यात हितेंद्र याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी हितेंद्रची आई वैशाली घरातील पुढच्या खोलीत झोपली होती तर वडील जळगाव येथे कामाला आले होते. हितेंद्र हा मागच्या खोलीत झोपला होता. साडे तीन वाजता आई झोपेतून उठल्यानंतर हितेंद्रला उठविण्यासाठी गेली असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला. गल्लीतील लोकांनी हितेंद्र याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकिय अधिकारी डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी मृत घोषित केले.नोकरीच्या शोधासाठी गेला होता पुण्यालाहितेंद्र याचे बी.ई.पर्यंत शिक्षण झाले होते. वडील खासगी कंपनीत नोकरीला आहेत. गेल्या आठवड्यात तो नोकरीच्या शोधासाठी पुणे येथे गेला होता. आठवडाभर पुण्यात शोध घेतल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तो सोमवारी रात्री घरी परत आला. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नसल्याने तो नैराश्यात गेला होता. त्यामुळे त्याने बुधवारी राहत्या घरातच गळफास घेऊन जीवन संपविले. दरम्यान, हितेंद्र हा वैशाली व विलास महाजन यांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच शेकडो तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.
जळगाव तालुक्यातील आसोदा येथे गळफास घेऊन तरुण अभियंत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:59 PM