चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील चंपावती नदीत हतनूर धरणातील पाणी सोडल्याने या नदीत पुराप्रमाणे पाणी वाहताना दिसत आहे.सध्या दुष्काळी स्थिती असल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच हतनूर धरणातून तापी नदीत पाणी सोडल्यास मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते म्हणून अमळनेर शहरासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूूने हतनूरच्या कालव्यातून चहार्डीकडे येणाºया चंपावती नदीत पाणी सोडण्यात आले आहे. दिनांक १० पासून चहार्डी मार्गे पाणी नदीतून सोडण्यात आल्याने तूर्तास चहार्डी येथील नदीला पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या नदीवर गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी दोन ठिकाणी नदी पात्र खोदून भव्य पाणी साठा करतील असे दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. हे दोन्ही बंधारे ओसंडून वाहत असल्याने व त्यात पाणी साठा झाल्याने पुढील महिनाभर तरी हे पाणी त्यात अडून राहणार आहे. म्हणून ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच बंधाराच्या आजूबाजूला असलेल्या कूपनलिका आणि विहिरींना पाणी प्रवाह वाढणार असल्याचे बोलले जात आहे.टंचाईच्या स्थितीत मिळाला दिलासाचहार्डी येथे गेल्या महिनाभरापासून पाणी टंचाई भीषण असल्याने या पाण्याचा दिलासा मिळणार आहे.गुरे ढोरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.जवळपास तीन ते चार दिवस हे पाणी सुरू राहणार असल्याने पावसाळ्या सारखे चित्र चहार्डी परिसरात निर्माण झाले आहे.
चहार्डी येथील चंपावती नदीला भर उन्हाळ्यात पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:31 PM