लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : परिवहन मंत्र्यासह आरटीओ अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र तानाजी पाटील यांची जळगाव व धुळ्यातील कारकीर्द वादग्रस्तच ठरली आहे. पोलीस दलातील परमवीरसिंह नंतर आता आरटीओतही तोच कित्ता गिरवला जात आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात जळगाव येथील आरटीओचे एजंट तसेच शिव वाहतूक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुलतान मिर्झा यांनाही नाशिक पोलिसांनी समन्स बजावले आहे.
दरम्यान, गजेंद्र पाटील हे जळगाव जिल्ह्यातील डोण दिगर (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी आहेत. या गावात पाटील यांची शेती व आलिशान बंगला आहे. यापूर्वी ते जळगाव शहरातील पिंप्राळा भागात वास्तव्याला होते. ते नाशिक आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असून निलंबनानंतर त्यांनी आपल्याच खात्याविरुद्ध बंड पुकारुन भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. त्याची चौकशी नाशिक गुन्हे शाखेकडून केली जात आहे.
गजेंद्र पाटील हे २००७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांची पहिली नियुक्ती सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून जळगावलाच झाली होती. मुंबई ईस्ट, अमरावती, जळगाव, धुळे व नाशिक येथे त्यांनी कामकाज केलेले आहे.
अश्लील पत्रक वाटप प्रकरणी धुळ्यात गुन्हा
अधिकाऱ्याविरुद्ध पत्रक वाटप करून बदनामी केल्याप्रकरणी गजेंद्र पाटील यांच्याविरुद्ध धुळ्यातील मोहाडी पोलिस ठाण्यात दिड वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. जळगावला असताना दिवंगत डेप्युटी आरटीओ सुभाष वारे यांच्याविरुद्धही अश्लील पत्रकबाजी केल्याचा ठपका पाटील यांच्यावर ठेवण्यात आला होता.
सुलतान मिर्झा यांची आज चौकशी
जळगाव येथील आरटीओचे एजंट तसेच शिव वाहतूक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुलतान मिर्झा यांनाही नाशिक पोलिसांनी समन्स बजावले आहे. सोमवारी त्यांची चौकशी होणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा यांनी संघटनेच्या नावाच्या ३२ पानांचे बदनामीकारक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हे पत्रक गजेंद्र पाटील यांनी मिर्झा यांना पाठवले होते, असे निष्पन्न झाले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात १७ मार्च २०२१ रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे. ज्या मोबाईल नंबरच्या व्यक्तीला यात आरोपी करण्यात आलेले आहे, तो नंबर सुलतान मिर्झा यांचा असल्याचे उघड झालेले आहे. याच संदर्भात त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.