नशिराबाद :
परस्परातील मतभेद विसरून स्नेह वृद्धिंगत व्हावा यासाठी ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ सांगणारा मकरसंक्रांतीचा सण यंदा १४ जानेवारीला साजरा होत आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजून १४ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून, दुपारी ४.१४ पर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे. श्रवण नक्षत्रावर यंदा संक्रांत होत आहे.
अशी आहे संक्रांत
यंदा बव करणावर संक्रांत होत आहे. संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे.
देवीने पांढरे वस्त्र परिधान केले आहे. हातात भृशुंडी घेतले असून कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. वयाने बाल असून बसलेली आहे. सुगंधाकरिता चाफा घेतला आहे. अन्न भक्षण करीत असून प्रवाळ रत्न आभूषणार्थ धारण केले आहे. वार नाव नंदा व नक्षत्र नाव महोदरी आहे. समुदाय मुहूर्त तीस आहे. पश्चिमेकडून पूर्वेस जात आहे व आग्नेय दिशेस पाहत आहे.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. संक्रांतीच्या पूर्णदिनी भोगी, १४ रोजी संक्रांत, दुसऱ्या दिवशी किंक्रात अशी नावे आहेत. संक्रांतीला परस्परांना तीळगूळ देत स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू देत सौभाग्य वाण देतात.
तिळाचे महत्त्व
या दिवशी तीळमिश्रित उदकाने स्नान करावे. तिळाचे उटणे अंगास लावणे, तीलतर्पण, तील होम, तीलभक्षण व तीलदान अशा प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास पुण्यप्रद असल्याचे शास्त्रवचन आहे. या दिवशी तिळाच्या वापराला अनन्य महत्त्व आहे, अशी माहिती ममुराबाद येथील भूषण महाराज जोशी व योगेश महाराज असोदेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
धान्याचे वाण देण्याची प्रथा
भारत
हा कृषिप्रधान देश असून संस्कृती कृषी आहे. या दिवसात शेतात आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोर, तीळ, गव्हाची ओंबी सौभाग्य वाण देवीला अर्पण करून वाण दिले जाते. अशी प्रथा आहे. यानंतर घरोघरी महिलांच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही होतो.
(बातमीत लिहिलेले पुढील शब्द समजलेले नाहीत... बव करणावर)