रवींद्र मोराणकरजळगाव : संयम, मेहनत आणि आत्मविश्वास या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा (आय. एस. एस.) परीक्षेत यश मिळवत, देशात चौथा तसेच राज्यात प्रथम क्रमांक मिळविला, असे हर्षदा नंदलाल छाजेड यांनी ह्यलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.जळगाव जिल्ह्यातील कळमसरे (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी असलेले छाजेड कुटुंब व्यवसायानिमित्त धुळे जिल्ह्यातील फागणे येथे स्थायिक झाले आहे.त्या पढे म्हणाल्या, यू. पी. एस. सी.चा हा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात २०१९ मध्ये माझी मुलाखतीस निवड झाली, मात्र मी अंतिम गुणवत्ता यादीत येऊ शकले नाही. परंतु आणखी मेहनत घेऊन पुढील वर्षी २०२० मध्ये भारतीय सांख्यिकी सेवा (आय. एस. एस.) या परीक्षेत उत्तीर्ण झाले. देशात चौथा आणि राज्यात प्रथम स्थान मिळविले.सध्या मी धुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात सांख्यिकी विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे.या परीक्षेचा अभ्यास मी पुणे येथे राहूनच केला. अभ्यासात सातत्य असल्याने यश मिळाले.भारतीय सांख्यिकी सेवा या परीक्षेचा अभ्यास करीत असताना पहिले पूर्ण अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका याचा अभ्यास केला, नंतर विस्तृत अभ्यास केला. त्यात नोट्स बनवणे आणि खूप सारा सराव आणि सोबत ध्यान साधनादेखील केले.माझे वडील पाच वर्षापूर्वी वारले. त्यानंतर माझा सांभाळ माझे काका प्रकाशचंदजी नंदलालजी छाजेड यांनी केला. त्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला व त्यामुळेच आज हे शक्य होऊ शकले आहे.शेवटी एवढेच सांगेल की संयम, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळते.
संडे स्पेशल मुलाखत- संयम, मेहनत व आत्मविश्वास या जोरावर मिळवले यश- हर्षदा छाजेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 00:27 IST