लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- जिल्हा प्रशासनाने दर शनिवारी व रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. रविवारी विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरात अभूतपूर्व बंद पहायला मिळाला. शहरातील अत्यावश्यक सुविधा सोडून सर्वच दुकाने पूर्णपणे बंद होती. मात्र शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक व मुख्य बाजारपेठ परिसरात मात्र काही भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटत लॉकडाऊनला काही प्रमाणात हरताळ फासलेला दिसून आला. तरी शहरातील मुख्य चौकात पोलिसांच्या देखील काही प्रमाणात बंदोबस्त कायम होता. यामुळे विनाकारण फिरणार्याची संख्या देखील रविवारी दिसून आले नाही. तर महापालिकेच्या पथकाकडून शहरातील विविध भागात फिरून नियम मोडणाऱ्यांना कारवाईची मोहीम हाती घेतली होती.
शहरातील मुख्य बाजारपेठेसह मुख्य रस्ते सकाळपासूनच ओस पडले होते. चौका चौकात पोलिस तैनात असलेल्या पोलिसांकडून तुरळक येणाऱ्या वाहनधारकांची चौकशी केली जात होती. काम नसतांना फिरणाऱ्यांना तरुणांना समज देवून परत पाठविण्यात येत होते. रविवारी अत्यावश्यक सेवेत दवाखाने व मेडिकल्स , दूध विक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना अशा बाबींना सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नसून कडक निर्बंध आहेत.रविवारी शहरातील संपूर्ण आस्थापना, दुकाने व अत्यावश्यक सेवेतील देखील अनेक दुकाने बंद होती.
भाजीपाला विक्रेत्यांकडून मात्र नियमांची पायमल्ली सुरूच
महापालिका प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी नऊ जागा निश्चित करून दिल्या आहेत. मात्र या जागांवर अनेक भाजीपाला विक्रेते व्यवसाय करण्यास मनाई करत आहेत. व ज्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे त्याच ठिकाणी अनेक व्यवसायिक व फळ विक्रेते आपले दुकाने थाटात आहेत. महापालिका प्रशासनाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात असताना देखील अनेक विक्रेते महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना देखील दिसून येतात. यामुळे आता पोलीस प्रशासनाने अशा उर्मट विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अनेक सलून व्यावसायिकांचे व्हिडिओ शूटिंग
रविवारी शहरातील काही सलून व्यवसायिकांनी लपतछपत आपले व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून आले. महापालिकेच्या पथकाकडून या व्यवसायिकांना रविवारी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसली तरी महापालिकेच्या पथकाने या सुरू असलेल्या दुकानांचे छायाचित्रण केले असून, सोमवारी दुकानदारांवर दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.