२) आदिवासी मुलांना वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणातून घेतली कोटीची उड्डाने
गिरीश महाजन यांच्या संपर्कामुळे त्याला आदिवासी समाजातील मुलामुलींना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना वाहन परवाना काढून देण्याचे राज्याचे टेंडर मिळाले. आदिवासी विभागाच्या या योजनेत मुलामुलींना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी लागते. पाळधी येथील साईबाबा मंदिरात या उमेदवारांची व्यवस्था केली जायची. या कामासाठी त्याने हजारो उमेदवारांची यादी मिळविली. प्रत्यक्षात फक्त ५० ते १०० उमेदवाराच त्याच्याकडे प्रशिक्षणाला असायचे, असे सांगितले जात आहे. या कामातून त्याला सुरुवातीला लाखो रुपये मिळाले. त्यातून त्याने आरटीओचे अधिकारी, आदिवासी विभागातील मंत्री, अधिकारी यांच्याशी संबंध वाढवून राज्यभरातील आदिवासी उमेदवारांच्या याद्या मिळवून त्यातून कोट्यवधी रुपयांची माया जमविली. कागदावर १० हजाराच्यावर उमेदवार असायचे तर प्रत्यक्षात चित्र वेगळेच असायचे. शासनाकडून कोट्यवधीचा निधी मिळत असल्याने यात पुढे चालून मंत्री, अधिकारी यांनाही त्याने हाताशी धरले. सरकार कोणाचेही असो, सुनील झंवर याची तेथे चलतीच राहायची.
३) मंत्रालयात एन्ट्री, आमदार निवासात कार्यालय
गिरीश महाजन यांच्याशी सलोखा अधिक वाढल्याने सुनील झंवर याची मंत्रालयात एन्ट्री झाली. मंत्री, अधिकारी यांच्याशी त्याचे जवळचे संबंध येऊ लागले. मुंबईतून सूत्र हलविता यावे यासाठी त्याने मुंबईतील एका आमदाराची मनोरा आमदार निवासात ३० हजार रुपये महिन्याची एक खोली मिळवली. त्यात कार्यालय थाटले. संगणक, कर्मचारी यासह इतर सर्व सुविधा तेथे उपलब्ध केल्या. दरम्यानच्या काळात गुजरात राज्यात सरकारी बसमधून एक टनापर्यंत माल वाहतुकीचा ठेका मिळविला. त्यातून त्याने मोठी मजल मारली. नंतर शालेय पोषण आहाराचा ठेका झवर याला मिळाला. त्यात गिरीश महाजन यांनी मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने शालेय पोषण आहाराचे मोठे कंत्राट त्याला मिळाले. त्यातून त्याला कोटीची माया मिळायला लागली. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. मात्र सुनील झंवरपर्यंत यंत्रणा पोहचलीच नाही. मधल्या काळात एकनाथ खडसे यांनी शालेय पोषण आहाराची तक्रार केली. अधिवेशनात मुद्दा उचललला. तेव्हाचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी फक्त आश्वासन दिले, पुढे काहीच झाले नाही.
इन्फो...
जोशींचा बंगला घेतला डीआरटी कोर्टातून
सुनील झंवर याने जय नगरातील गोल्ड जीमच्या समोरील गल्लीत अलिशान बंगला खरेदी केली आहे. फसवणूक प्रकरणात अडकलेल्या जोशी दाम्पत्याचा हा बंगला होता. डीआरटी कोर्टातून अगदी कमी किमतीत त्याला हा बंगला मिळाला. पाळधी येथील साई मंदिराची त्याने उभारणी केली. तेथे नेमलेल्या श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यात झंवर हा सेक्रेटरी असून शरदचंद्र कासट अध्यक्ष तर त्याचे वडील देवकीनंदन पितांबर झंवर कार्याध्यक्ष आहेत. नितीन लढ्ढा देखील ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष आहेत.