सचिन पाटील जळगाव : पतीला लकव्याचा धक्का बसला. पतीच्या उपचारासाठी तिनं राहतं घर विकलं अन् तिच्या आयुष्याचा चित्रपट सुरु झाला, आज ती संसारात उभी आहे अन् पहाटेपासून सायंकाळपर्यंत काबाडकष्ट करू दैवाशी अन् संकटाशी झगडते आहे. एखादी महिला आयुष्यात ताकदीने उभी राहिली तर तिच्यासमोर सारी संकटंही जणू नतमस्तक होतात, हेच या महिलेने स्वत:च्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे.यावल तालुक्यातील पाडळसे गावातील पुष्पा दिनकर पाटील (६०) असं तिचं नाव. नेहरूनगरात एक चहाची टपरी आहे. पती अन् मुलासोबत तिचं आयुष्य सुखी होतं. पण दहाएक वर्षापूर्वी तिच्या पतीला लकवा झाला अन् संकटे सुरु झाली. तिनं तिचं गावातील राहतं घर विकलं अन् ती शहरात रहायला आली, भाड्याने खोली घेतली. तिच्या मुलाला एव्हाना एका कंपनीत छोटी नोकरीही मिळाली होती. मुलाचं लग्न झालं. पतीही हळूहळू बरा होत होता.आयुष्याची विस्कटलेली घडी आता इस्त्री केलेल्या कपड्यासारखी पुन्हा व्यवस्थित होतेय, असं तिचं मन तिला सांगत होतं. पण ते खोटं होतं अजून खूप काही तिला पहायचं होतं. तिच्या पतीला पुन्हा लकव्याचा त्रास सुरु झाला. तिची सून गरोदर होती. एकीकडे आनंद अन् दुसरीकडे पतीच्या आजाराचा तणाव अशा व्दिधा परिस्थितीत ती होती. पण तिच्या आयुष्याची कथा इथं संपत नाही.सून गरोदर होती, तेवढ्यातच तिच्या मुलाचा जोरदार अपघात झाला, अन् तिच्या मनावर आणखी एक घाव बसला. तिच्या मुलाचं निधन झाले. नियती पण किती क्रूर असते बघा, तिच्या मुलाच्या निधनानंतर सहा दिवसातच तिच्या सुनेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.मुलगा इहलोकी गेला अन् उत्पन्नाचं मोठं टेन्शन उभं राहिलं, घरात कुणीच कमावता नाही. घराचे भाडे, रोजचा खर्च, नुपूर व तन्मय ही नातवंडंही शाळेत जाऊ लागली होती, त्यांचा खर्च अन् जोडीला पती लकव्याने आजारी. त्याच्या आजारपणावर होणारा खर्च. हा सारा खर्च कसा पेलवायचा? असा प्रश्न उभा राहिला.तिनं ठरवलं, हरायचं नाही अन् रडायचं तर नाहीच नाही, उभं रहायचं. सुनेला घेतलं अन् तिनं मनाशी ठरवलं. तिने नेहरूनगरात एक चहाची टपरी टाकली. पहाटे ४.३० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत कशाचीही पर्वा न करता तिने चहाचा व्यवसाय केला अन् हळूहळू घर मानसिकदृष्ट्या सावरलंं नसलं तरी आर्थिकदृष्ट्या सावरू लागलं. बुध्दीमत्तेच्या जोरावर नोकरी मिळवणं खूप सोप्पं असेल कदाचित पण संकटाच्या चक्रव्यूहात उभं असताना तो भेदून मनाचा दगड करून उभं राहणं, किती अवघड असतं, हे या महिलेच कथेवरून दिसून येते.हक्काचं घर-दार नव्हतं, होतं ते पतीसाठी विकून टाकलं अन् शून्य होऊन ती जळगावात आली, पण तिला इथं देवमाणसं भेटली. कुणी तिला आर्थिक मदत केली. घरमालकाने तिच्याकडे कधीही भाड्यासाठी तगादा लावला नाही, त्यामुळे आपण आयुष्यात उभं राहू शकल्याचे त्या आवर्जून सांगतात.सासू-सुनेचं नातं मायलेकीपेक्षाही उजवेसासू-सुनेचं नातं म्हटलं की, घरात भांड्याला भांडं जास्तच लागतं. पण या घरात सासू-सुनेचं नातं हे मायलेकीपेक्षाही उजवं राहिलं. दुर्दैवाने सुनेलाही आई-वडिल नाहीत. त्यामुळे पतीच्या निधनानंतर सासू सासऱ्यांमध्येच आपले आईवडिल पाहिले अन् ती सासऱ्यांची सेवा करू लागली अन् सासूबार्इंना मदत करू लागली.
सुनेच्या साथीने ‘ती’नं लढायचं ठरवलं अन् मोठ्या संकटांना हरवलं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:17 PM