जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी दुपारी मोहाडी महिला रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डेडीकेटेट कोविड हॉस्पीटलची पाहणी केली. या ठिकाणी ७ रुग्ण दाखल आहेत. जीएमसीतील काही रुग्ण या ठिकाणी दाखल करण्याचे नियोजन असून त्यासाठी ही पाहणी केल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.
रुग्णाचे ॲडमीशन हे जीएमसीत केल्यानंतर त्या ठिकाणाहून त्याला दाखल कुठे करावे, हे नियोजन करण्याच्या हालचाली आहेत. त्यानुसार इकरा आणि जीएमसीतील रुग्ण या मोहाडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, इकरा सेंटरमधील अनेक रुग्ण हे त्या ठिकाणाहून जायला तयार नसल्याची माहिती आहे. दरम्यान, रुग्ण दाखल करण्यासाठी एक यंत्रणा हवी, समन्वय हवा त्यामुळे रुग्णांच्या अडचणीही दूर होतील, असाही एक सूर उमटत आहे. मोहाडी रुग्णालयात प्रशस्त व्यवस्था असल्याने तातडीने ही यंत्रणा कार्यान्वित व्हावी, अशी मागणी होत आहे.
ड्युरा सिलिंडरचे नियोजन
इकरा महाविद्यालयात ड्युरा सिलिंडर लावण्यात आले आहे. यातून लिक्विडचे थेट गॅस मध्ये रूपांतर होते. हेच सिलिंडर मोहाडी रुग्णालयात बसविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ते आल्यानंतर या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा सुरू होणार आहे. सद्य दाखल ७ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करावा लागत नसल्याची माहिती आहे.