जळगाव : लॉकडाऊनच्या काळात सील उघडून मद्य विक्री केल्याप्रकरणी नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स या मद्य विक्री एजन्सीचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी कायमस्वरुपी रद्द केला आहे. राजकुमार शीतलदास नोतवाणी व अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी अनिता शिरीष चौधरी यांच्या नावाने हा परवाना होता. अधीक्षक नितीन धार्मिक यांनी ही कारवाई केली आहे. या ट्रेडर्समधील सर्व साठा जप्त केला जाणार आहे. दरम्यान, क्रिश ट्रेडर्समधून आर.के. वाईन्ससह जळगाव शहर व बाहेरदेखील इतर वाईन शॉपवर दारुचा पुरवठा झाल्याचे उघड झाले असून त्याचीही वेगळी चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या वाईन शॉप व परमीट रुमवर येथील दारू आलेली आहे, ते व्यावसायिकदेखील आता रडारवर आले असून यात काही राजकीय मंडळींच्या मद्य दुकानांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल रोजी सकाळी अजिंठा चौकात कारमधून (क्र.एम.एच.१८ डब्लु ९८४२) वाहतूक होत असलेला दारुचा साठा जप्त केला होता. वाहन व दारू मिळून त्याची किंमत ४ लाख ६० हजार ५४ रुपये इतकी होती. नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स येथून हा साठा आल्याचे चौकशीत उघड झाले होते. त्यानंतर तेथील गोदामही राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केले होते. तेथील तपासणीत तब्बल १२ हजाराच्यावर बाटल्यांची तफावत आढळून आली. दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला होता. तेव्हाच ‘लोकमत’ने क्रिश ट्रेडर्सचे काय म्हणून याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर लगेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने या एजन्सीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे.दुय्यम निरीक्षक असतानाही मद्याची विक्रीमद्याच्या एजन्सी व ट्रेडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा स्वतंत्र दुय्यम निरीक्षक नेमण्यात येतो. मग असे असतानाही सील उघडलेच कसे व तेथून मद्याचा पुरवठा झालाच कसा? हा प्रश्न आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत लॉकडाऊन काळात नोतवाणी यांच्या संपर्कात असलेल्या आठ पोलीस निष्पन्न झाले असून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे, विशेष म्हणजे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती काय ठपका ठेवते त्यावर पोलिसांवरील कारवाई अवलंबून आहे. पोलीस प्रशासन कठोर कारवाई करीत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग आपल्या अख्त्यारित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार?, अशी चर्चा आता सुरू आहे.इतर वाईन शॉपवरही दारुचा पुरवठासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्समधून आर.के. वाईन्ससह शहर व बाहेरदेखील इतर वाईन शॉपवर दारुचा पुरवठा झाल्याचे उघड झाले असून त्याचीही राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आणखी वेगळी चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या वाईन शॉप व परमीट रुमवर येथील दारू आलेली आहे, ते व्यावसायिकदेखील आता रडारवर आलेले आहेत.मालक व भागीदाराकडून अटी, शर्तीचा भंगलॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील सर्व देशी,विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले होते.असे असूनही क्रिश ट्रेडर्सचे सील उघडून मद्याची विक्री झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा,१९४९ चे कलम ५६ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना अशाप्रकारे आदेशाचे उल्लंघन करणाºया राजकुमार शीतलदास नोतवाणी अनुज्ञप्तीधारक व भागीदार अनिता शिरीष चौधरी यांनी मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ व महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या) नियम १९६९ तसेच एफएल-१ अनुज्ञप्तीच्या अटी, शर्तीचा भंग केल्याचे उघड झाले.लॉकडाऊन काळात परवानाधारक व भागीदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. त्यामुळे क्रिश ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. तूर्तास तरी इतकाच विषय आहे.याआधी आर.के.वाईन्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मद्याचा साठा जप्त करण्यात येणार आहे.-नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
क्रिश ट्रेडर्समधून इतर दुकानांनाही मद्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:24 PM