रावेर - तालुक्यातील खानापूर येथे भोरगाव लेवा पंचायत महाधिवेशनात पारीत केलेल्या सामाजिक ठरावान्वये आदर्श निर्णयांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित बैठकीत सामाजिक कार्यकर्ते वामन हरी धांडे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या मुलाच्या 14 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या लग्नवरातीकरिता बुक केलेला डिजे रद्द करीत असल्याचे घोषित करून निव्वळ समाजातील प्रतिष्ठेच्या बडेजावपणासाठी डिजिटल म्युझिकल बँडकरिता निरर्थक खर्च केले जाणार्या अर्धा ते सव्वा लाख रुपयांच्या खर्चाची बचत करण्यासह ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं आदर्श प्रस्थापित केला आहे.खानापूर गावातील समस्त लेवा पाटीदार समाजाची साधारण सभा बुधवारी संपन्न झाली. पाडळसे येथे भोरगाव लेवा पंचायत महाअधिवेशनात कुटुंबनायक रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या ठरावांची माहिती सादर करून, समाजबांधवानी सर्व संमतीने ती सामाजिक आचारसंहिता अंमलात आणण्याचा एकमुखी घेतला.त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते वामन हरी धांडे यांनी पुणे येथे खासगी कंपनीत सेवारत असलेल्या बीएससी पदवीधर असलेल्या रुपेश या मुलाच्या सावदा येथे 14 फेब्रुवारी रोजी आयोजित शुभमंगल विवाहातील लग्न-वरातीकरिता बुक केलेला डिजे रद्द करीत असल्याचा निर्णय घोषित केला आणि समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे उपस्थित समाजबांधवानी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या शाखेद्वारे समाजप्रबोधनासाठी अधिवेशनाचा हा संदेश व सभेतील ठरावांची माहिती आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. "सकल लेवा पाटीदार "समाजाच्या उभारणीसाठी समाजातील पोटजातींचे एकत्रीकरण करून विवाह संबंध प्रस्थापित करीत त्याची मुहूर्तमेढ करून प्रोत्साहन देण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
वरपित्याने 14 फेब्रुवारीच्या लग्नाच्या वरातीसाठी बुक केलेला डिजे केला रद्द, लेवा पाटीदार समाजाचा आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 9:02 AM