लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पुणे येथे बीएचआर घोटाळ्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सुरज झंवर (रा. जयनगर, जळगाव) याला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. अर्टी शर्तीनुसार महाराष्ट्राच्या बाहेर थांबण्याचे आदेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. तसेच आर्थिक गुन्हे शाखेला तपासात सहकार्य करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.
बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर मागील काही महिन्यांपासून पोलीस कोठडीत आहे. सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. सुरज याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी दाद मागितली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम.डल्ब्यू सामरे यांच्या न्यायालयात शुक्रवारी सुरज झंवरच्या जामीन अर्जावर कामकाज झाले. सुनावणीअंती अटी-शर्तींवर झंवर याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात प्रवेश नाही
सुरज झंवर याला अटी-शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राबाहर थांबण्याचे आदेश केले आहे. त्यामुळे सुरज याला महाराष्ट्रात प्रवेश नसणार आहे. जोपर्यंत सुनील झंवर पोलिसांना मिळून येत नाही. तोपर्यंत सुरज हा राज्याबाहेर राहील, अशी माहिती ॲड. प्रवीण चव्हाण यांनी दिली.