लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे मानसिक संतुलन ढासळले असून, ते कोणतेही आरोप करत आहेत. राज्य शासनाने लुंकड यांच्या अर्जानुसार मनपाकडून अहवाल मागविला आहे. ही रितसर प्रक्रिया असून, आमदार सुरेश भोळे यांनी कोणतीही शहानिशा न करताच ‘मविआ’वर आरोप केला आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसून, आमदार भोळे यांनी ग्रामीणकडूून आता शहराकडे लक्ष द्यावे, असा टोला महाविकास आघाडीतील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आमदार भोळे यांना लगावला आहे.
सागर पार्कचे आरक्षण काढण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून आयुक्तांवर १०० कोटींचा मोबदला देण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी रविवारी केला होता. याबाबत आयुक्तांनी ही माहिती दिल्याचेही आमदार भोळे यांनी सांगितले होते. यावर सोमवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. लुंकड यांच्याकडून सागर पार्कचा मोबदला मागितला जात असल्याप्रकरणाची पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांकडून माहिती मागवू घेतली.
काय आहे प्रकरण
१. मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाने ही जागा रितसर न्यायालयीन लढ्याने जिंकली आहे. यासाठी शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनीही मनपाची बाजू लावून धरली होती. या जागेबाबत लुंकड परिवाराने मोबदला मागितला आहे. यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे अर्ज केला होता. त्यानुसार राज्य शासनाने मनपाला पत्र पाठवून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
२. मनपाने अहवाल सादर केला का नाही? याबाबत लुंकड यांच्या वकिलांकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, ही जागा मनपाचीच असल्याने आयुक्त मनपाच्या हिताचाच अहवाल पाठविणार आहेत. त्यामुळे १०० कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही? अशी माहिती सुनील महाजन यांनी दिली. सुरेश भोळे यांचे आरोप निराधार असून, यात केवळ ‘मविआ’ला गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, सागर पार्क हा शहरवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याने हे मैदान मनपाकडेच रहावे, यासाठी ‘मविआ’तील तिन्ही पक्ष मनपाच्या बाजूने आहेत, असेही महाजन म्हणाले.
कोट..
बीएचआरच्या प्रकरणात माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव येत असल्याने इतर प्रकरणामध्ये काहीही आरोप करून, बीएचआरच्या प्रकरणावरून लक्ष हटविण्याचा आमदार भोळेंचा प्रयत्न आहे. आमदार भोळे यांनी ग्रामीणचा विचार न करता शहराच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. आधी जळगाव शहराचे प्रश्न सोडवा त्यानंतरच इतरकडे लक्ष द्या. गिरीश महाजन यांची वकिली घेण्यापेक्षा शहराचे प्रश्न त्यांनी सोडवावेत.
-अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सुरेश भोळे यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तसेच आमदार भोळे यांनी या प्रकरणाचा अभ्यास करावा, त्यानंतरच कोणतेही विधान करावे. केवळ इतर मुद्द्यांवरून नागरिकांचे लक्ष हटविण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. सागर पार्कची जागा शहरवासीयांचीच असून, यासाठी शिवसेना देखील मनपाच्या बाजूूने आहे.
-शरद तायडे, महानगरप्रमुख