जळगाव : तापी पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांच्या पुणे येथील दोन फ्लॅटची झडती जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी घेण्यात आली. त्यात युको बॅँकेच्या डेक्कन जिमखाना शाखेतून लॉकरची चाबी आढळून आली. या लॉकरची तपासणी केली असता लॉकरमधून 31 लाख 70 हजार 493 रुपयांच्या मौल्यवान वस्तु लाचलुचपत विभागाच्या पथकाने जप्त केल्या आहेत. जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने 19 एप्रिल रोजी कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून त्यांना 4 लाख 25 हजार लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी त्यांच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अटक झाली होती. दोन दिवस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. लॉकरची चाबीही कारवाई केल्यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून सुरेश सावंत यांच्या पुणे येथील दोन फ्लॅटची झडती घेण्यात आली. यामध्ये पुण्यातील युको बॅँकेच्या डेक्कन जिमखाना शाखेतील लॉकची चाबी मिळून आली. या लॉकरची तपासणी केली असता यामध्ये 31 लाख 70 हजार 493 रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने व मुदत ठेवीचे प्रमाणपत्र मिळून आले. सावंत त्यांच्या नियुक्तीचे अधिकार हे शासनाच्या जलसंपदा विभागाला आहेत. सावंत यांच्यावरील कारवाई संदर्भातील सविस्तर अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तापी पाटबंधारे विभागाला तसेच शासनाच्या जलसंपदा विभागाला पाठविला आहे. प्राप्त अहवालाच्या आधारावर तापी पाटबंधारे महामंडळानेही सावंत यांच्यावरील कारवाई संदर्भातील अहवाल राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना सोमवारी सायंकाळी पाठविला आहे. या अहवालावर आता जलसंपदा प्रधान सचिव सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुरेश सावंत यांच्या लॉकरमधून 31 लाखांचा ऐवज जप्त
By admin | Published: April 26, 2017 12:20 AM