फोटो : २.२७ वाजेचा, सागर दुबे नावाने मेल, (प्राचार्यांना घेराव घालून चर्चा करताना अभाविप कार्यकर्ते)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शुल्क आकारणीबाबत मंत्रालयात किंवा संबंधित वरिष्ठ कार्यालयात तक्रार केल्यास विद्यार्थ्यावर महाविद्यालयाकडून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असा विद्यार्थ्यांना दम भरणारे पत्र शासकीय अभियांत्रिकीकडून काढण्यात आले आहे. या पत्राचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी शासकीय अभियांत्रिकीत पत्र मागे घेण्यासाठी जोरदार घोषणबाजी करीत अभाविपकडून निदर्शने करण्यात आली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी आकारले जाणारे विकास शुल्क व अन्य शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जाते, अशी तक्रारी काही विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली होती. अभाविपनेसुद्धा जादा शुल्क आकारणीबाबत वेळोवेळी महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षातदेखील आणून दिले आहे. मात्र, महाविद्यालय प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली होत नसल्यामुळे विद्यार्थी संघटनांनीसुद्वा उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केली होती.
होणाऱ्या परिणामास विद्यार्थी जबाबादार
दरम्यान, विद्यार्थी मंत्रालय व उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करीत असल्याची बाब महाविद्यालयाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे परस्पर तक्रार करणे महाविद्यालयाच्या शिस्तीत बसणारे नसून, विद्यार्थ्याने विभागप्रमुखांकडे आपले म्हणणे प्रत्यक्ष मांडावे, असे पत्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून ७ एप्रिल रोजी काढण्यात आले आहे, तसेच यापुढे शुल्क आकारणीबाबत जर कुणी मंत्रालय किंवा वरिष्ठ कार्यालयात तक्रार केल्यास अशा विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल व त्या परिणामाला स्वत: विद्यार्थी जबाबदारी राहील, असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.
विभागप्रमुखांकडे म्हणणे सादर करावे
विद्यार्थ्यांना शुल्काबाबत काही म्हणणे मांडायचे असेल, तर त्याचा स्वतंत्र अर्ज विभागप्रमुखांकडे सादर करावा. संबंधित अर्ज हे संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील, असेही महाविद्यालयाच्या पत्रात म्हटले आहे.
निषेध आंदोलन
महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांना धमकावण्याचे पत्र महाविद्यालय प्रशासनातर्फे काढणे अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हणत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शुक्रवारी सकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच प्राचार्यांचीसुद्धा भेट घेण्यात आली व लवकरात लवकर पत्र मागे घेण्याची मागणी करण्यात आली. येत्या एक ते दोन दिवसांत पत्र मागे घेण्यात येईल, असे प्राचार्यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती अभाविपने दिली. आंदोलनात अभाविपचे महानगरमंत्री आदेश पाटील, रितेश महाजन, हिमानी वाडीकर, दुर्गेश वर्मा, मयूर अल्कारी, अंकित चव्हाण, मनीष चव्हाण, कृष्ण भारी, दीपक धनगर आदी उपस्थित होते.