अमित महाबळ
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२४ ते २०२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता बृहत आराखडा तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना स्वत:साठी अभ्यासक्रम कसा असावा हे सूचविण्याची संधी मिळाली आहे.
बृहत आराखडा तयार करण्यासाठी समाजातील विविध घटकांचे अभिप्राय विचारात घेतले जात आहेत. सर्वेक्षणासाठी दि. १२ मार्चपर्यंत मुदत आहे. सर्वेक्षणाची प्रश्नावली भरून घेण्यासाठी ६० महाविद्यालयांची प्रातिनिधीक यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये जळगावातील ३०, धुळेतील १७ व नंदुरबारमधील १३ महाविद्यालयांचा समावेश आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक यांच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्राचार्य, संस्थाचालक, उद्योजक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी संवाद साधून प्रश्नावली भरून घेतली जात आहे.
विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता बृहत आराखडा तयार करण्यासाठी समिती गठित केली आहे. समितीने २८ फेब्रुवारीपर्यंत अभिप्राय मागवले होते. या व्यतिरिक्त हे सर्वेक्षण देखील केले जात आहे. उच्च शिक्षणाच्या सुविधांचे सर्वसमावेशक, समन्यायी वाटप होण्याच्या दृष्टीने, युवती/युवकांसाठी गुणवत्तापूर्ण आणि व्यावसायाभिमुख उच्च शिक्षणाचे कोणते नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करता येतील यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
या घटकांना संधी
पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली भरून घेतली जात आहे. पदवीच्या प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश नाही. व्यावसायिक गटापैकी सेवा, प्रशिक्षण, बांधकाम, कृषी, वाहतूक, निर्मिती, प्रक्रिया, विक्री, स्टेशनरी, कापड व इतर घटकांकडून भरून घेतली जात आहे.
यांनी भरली माहितीविद्यार्थी : १८६९प्राचार्य : १९चेअरमन ऑफ इन्स्टिट्यूट : ०९उद्योगपती : ०१शिक्षक : ४३०शिक्षकेतर कर्मचारी : १२९अधिसभा सदस्य : ०५पालक : ४५३सामाजिक कार्यकर्ते : ४२