जळगाव : मनपा वैद्यकीय विभागाकडून शहरातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. महिनाभरात शहरातील १ लाख ८१ हजार नागरिकांचा सर्वे पूर्ण झाला असल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी दिली. आठवडाभरात अडीच लाख नागरिकांचा सर्व्हे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी मनपाचे ४० पथके काम करत आहेत.जळगाव शहरात मेहरूण व सालारनगर भागात कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर मनपाकडून खास उपाययोजना करण्यात आल्या. मेहरुण व सालारनगरमध्ये सलग १४ दिवस ३१ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सुदैवाने दोन्ही भागात कोरोनाची लक्षणे असलेला एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आता वैद्यकीय विभागाने या दोन्ही भागातील सर्वेक्षणाचे काम थांबविले आहे. मात्र, अधून-मधून या भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. मनपाने आता शहरातील दाट वस्त्यांमधील सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून, त्यापैकी अनेक भागांमध्ये सर्वेक्षणाचे कामदेखील पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळतात अशा नागरिकांची दररोज मनपा वैद्यकीय विभागाकडून माहिती घेतली जात आहे.शाहू रुग्णालयात जिल्हाभरातील ३५ संशयितमनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात एकूण कोरोनाचे ३५ संशयित रुग्णांना प्राथमिक उपचार सुरू आहेत. यामध्ये दहीगाव येथील ६, अमळनेर येथील ७, चोपडा येथील ८, मुंगसे येथील ११ तर जळगावच्या ३ संशयिताचा समावेश आहे. ३५ संशयितांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अद्याप अहवाल प्राप्त झाले नाहीत. तसेच ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येतील अशा रुग्णांना सोडले जाईल मात्र, घरातच १४ दिवस क्वॉरंटाईन रहावे लागेल, अशी माहिती डॉ.रावलानी यांनी दिली.र्
जळगावात एक लाख ८१ हजार नागरिकांचा सर्व्हे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:52 AM