जळगाव: राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली असून मंगळवार (दि.२३) पासून प्रत्यक्ष घरोघरी जावून सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील शहर महानगरपालिका, तालुक्यातील सर्व नगरपालिका/नगरपरिषदा व तालुक्यानिहाय सुमारे ८ हजारापेक्षा जास्त प्रगणक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात ठराविक प्रगणक राखीव असून उर्वरित प्रगणक प्रत्यक्ष सर्वेक्षणाची कार्यवाही करणार आहेत.
सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्ह्यात सुमारे एक हजार पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच सर्वेक्षणाच्या कामकाजात समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी आणि सहायक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.