जळगाव : दोन गर्भाशयाचा गुंता वाढल्याने प्रकृती धोकादायक झालेल्या एका महिलेची शस्त्रक्रिया करून तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्री रोग विभागाच्या डॉक्टरांना यश आले आहे. यासह अन्य एका महिलेवरही यशस्वी औषधोपचार करून तिला धोक्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. दोन्ही महिला रुग्णांना सोमवारी (दि.२३ ऑगस्ट) अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते साडी, लोहवाढीच्या गोळ्या, मिठाई व पौष्टिक आहार देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
पिंपळगाव तांडा (ता. जामनेर) येथील २३ वर्षीय महिलेच्या पोटात दुखत असल्याने, तसेच यापूर्वी दोनवेळा गर्भपात झाल्याने या महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. अनेक खासगी रुग्णालयांनी उपचार होणार नाही म्हणून दाखल करून घेतले नाही. अखेर १६ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. येथे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेची तपासणी केली. यात महिलेच्या पोटात दोन गर्भाशय दिसून आले, पैकी एक अविकसित होता. त्यात गर्भ राहिल्याने आणि तोही तुटलेल्या स्थितीत असल्याने तिचा जीव धोक्यात होता. यावेळी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने तातडीने शस्त्रक्रिया करून अविकसित गर्भाशय व तुटलेला गर्भ काढून महिलेला निगराणीखाली ठेवले. आता ही महिला बरी झाल्याने या महिलेला निरोप देण्यात आला. यावेळी स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागातील डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. प्रदीप पुंड, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. सुधीर पवनकर, डॉ. कोमल तुपसागर, डॉ. संजीवनी अनेराय, डॉ. चंदन महाजन, डॉ. शीतल ताटे, डॉ. हेमंत पाटील, आदी उपस्थित होते.
अन्य महिलेवर उपचार
११ ऑगस्टला एचआयव्ही बाधित महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तिला दुसऱ्या बहिणीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तिची रक्त तपासणी केली असता हिमोग्लोबिन १. ४ इतका कमी निघाला. त्यामुळे तत्काळ उपचार सुरू करून पाच रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्या. महिलेस सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. प्रसंगी तिच्या बहिणीचीदेखील तपासणी केली असता हिमोग्लोबिन चार इतका कमी निघाला. तिलाही उपचारासाठी दाखल केलेले आहे.