जळगाव : वेळ आला होता पण काळ आला नव्हता, याचा प्रत्यय रेल्वेने मुंबईकडे निघालेल्या गुप्ता कुटुंबाला आला़ साडेतीन वर्षीय बालक धावत्या रेल्वेतील आपत्कालीन खिडकीतून खाली पडला आणि आश्चर्यकारकरित्या बचावला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बालकाच्या कपाळाला सुमारे १६ टाके पडले आहेत.विनायक श्रीकुमार गुप्ता असे या जखमी बालकाचे नाव आहे. आई आणि तो दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाले होते. विनायकचे वडील मुंबई येथे राहतात. गुप्ता कुटुंबिय उत्तरप्रदेशचे आहे़गुप्ता कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक हा आपत्कालीन खिडकीजवळ खेळत होता़ भुसावळ रेल्वे स्थानकातून गाडी निघाल्यानंतर त्याची आई त्याला सोडून बॅगमध्ये काहीतरी घेण्यासाठी गेली़ एवढ्यात तो खिडकीतून थेट खाली पडला़ हे लक्षात येताच आरडा- ओरड सुरू झाली व काही प्रवाशांनी तत्काळ चेन ओढून गाडी थांबविली़ त्याला गाडीत आणण्यात आले. गाडी जळगावला आल्यावर आरपीएफचे हेकॉ. एस़ के़ गुप्ता व जीआरपी अजय मून यांनी या बालकाला जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले.विनायक याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने त्याचा डोळा बचावला़ त्याला १६ टाके पडले आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
रेल्वेच्या आपत्कालीन खिडकीतून आश्चर्यकारकरित्या बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:02 PM