आकाश नेवे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अपघातात दोन्ही पावंडे गमावल्यावर हिंमत न हारता उलट जिद्दीच्या जोरावर जळगावच्या सुशील शिंपी याने कृत्रिम पावलांच्या सहाय्याने अक्षरश: आकाश ठेंगणे केले आहे. त्याने दोन्ही कृत्रिम पावंडांच्या साहाय्याने १८,३८० फूट उंचीवरील मनाली ते खारदुंगला पास हा जगातील सर्वात उंच रस्ता सायकलीने पार करीत जणू आकाशालाच गवसणी घातली. यासोबतच त्याने ५२५ कि.मी. सायकलिंगचाही विक्रम केला आहे. ३० जुलै ते ९ आॅगस्ट या कालावधीत त्याने मनाली ते खारदुंगला पास हे अंतर सायकलीने पूर्ण केले. दोन्ही कृत्रिम पायांनी हे अंतर पार करणारा तो बहुदा पहिलाच सायकलिस्ट आहे. २०११ मध्ये सुशीलचा अपघात झाला होता. त्यात त्याने दोन्ही पाय गमावले. त्यानंतर सात महिने तो अंथरूणावरच पडून होता. नंतर त्याला कृत्रिम पायांबाबत माहिती मिळाली. अथक प्रयत्नांनी त्याला पाय मिळाले. मात्र या पायांचा उपयोग फक्त चालण्यासाठीच होईल, अशी कडक सूचनादेखील त्यासोबतच मिळाली. पण हळूहळू पुन्हा चालायला शिकल्यानंतर त्या सूचनेतून सवलत घेत सुशिल नंतर मोपेड, स्कूटर चालवायला लागला. त्याने बाईक चालवायला घेतली. दरम्यानच्या काळात तो विनोद रावत यांच्या संपर्कात आला. विनोद रावत यांनी एका कृत्रिम पायाने धावत अनेक मॅरेथॉन गाजवल्या, शिखरे सर केली आहेत. अनेक कठीण रस्त्यांवर बाईकदेखील चालवली आहे. हीच बाब सुशीलसाठी प्रेरणादायी ठरली.त्यानेदेखील निर्धार केला आणि मुंबईकर विनोद रावतच्या साथीने प्रयत्नांना सुरुवात केली. २०१३ मध्ये काही लहान मॅरेथॉनमध्ये धावून विश्वास आल्यावर मुंबई, दिल्ली, ठाणे मॅरेथॉनमध्येदेखील त्याने आपला सहभाग नोंदवला.पुण्यातील अॅडव्हेंचर बियॉँड बॅरियर या क्लबसोबत त्याने लेह ते मनाली हे अंतर पूर्ण केले. ही रॅली अंध आणि कृत्रिम पाय वापरणाºयांसाठी आयोजित करण्यात आली होती. ३० जुलै रोजी मनालीतून फ्लॅग आॅफ झाल्यावर हा चमू रोहतांग पासकडे निघाला. त्यानंतर दररोज चाळीस ते साठ कि.मी. अंतर चालवत १३ दिवसांत हे अंतर पूर्ण केले. जळगावमध्येदेखील सुशील कॉन्व्हॉय क्लबच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतो. यासाठी त्याला आमदार सुरेश भोळे, उद्योजक किरण बच्छाव, डॉ. अक्षय जोडगे यांचे सहकार्य लाभले.
ब्लेडची गरजसुशील आपल्याकडे असलेल्या कृत्रिम पायांनी धावत असला तरी या पायांचा उपयोग फक्त चालण्यासाठी केला जातो. धावण्यासाठी आवश्यक असलेले ब्लेड (प्रोस्थेटिक लिम्ब्ज) मिळावे म्हणून त्याचे प्रयत्न सुरू आहेत.ते ब्लेड मिळाल्यास पॅरालिम्पिकसाठी आपण नक्कीच प्रयत्न करू, असे सुशील शिंपी याने सांगितले.
जिद्दीने बदला जगमनाली ते खारदुंगला पास पूर्ण करण्याची इच्छा होती. मात्र त्यासाठी आवश्यक ती रक्कम नसल्याने मागे हटण्याची वेळ आली होती. मात्र वेळीच मदत मिळाल्याने आपण हे लक्ष्य पूर्ण करू शकलो त्याचा आनंद अवर्णनीय आहे. अपघात झाल्यावर पाय गेल्याने खचून न जाता जिद्दीने आपण आपली दुनिया बदलली. दिव्यांगांनी नेहमीच अशा प्रकारच्या स्पर्धात सहभागी व्हावे, आपल्यात काही कमी असे समजू नये. महत्त्वाकांक्षी राहिल्यानेच यश मिळत असल्याचे सुशील याने सांगितले.