लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हिंदू धर्माबद्दल अपशब्द बोलणारे व कीर्तनकारांना शिवीगाळ करणारे बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे निलंबन व्हावे, यासाठी सोमवारी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार व प्रातांना निवेदन देण्यात येणार आहे व महिन्याभरात राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना १ लाख पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अध्यात्मिक ग्रामीण आघाडीचे अध्यक्ष सागर महाराज, हेमंत जोशी, दीपक सूर्यवंशी, गणेश माळी, मनोज भांडारकर, आदींची उपस्थिती होती.
आमदारांचे निलंबन होत नसेल, तर लॉकडाऊनचा कालखंड संपल्यानंतर वारकरी संप्रदायाकडून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असेही जळकेकर महाराज यांनी सांगितले. आमदार गायकवाडांमुळे शिवसेना पक्षाची बदनामी होत आहे, त्या बदनामीपासून वाचायचे असेल तर गायकवाड यांचे तत्काळ निलंबन करावे. अन्यथा मातोश्री व वर्षा बंगल्यावर एक लाख पत्र पाठविण्यात येतील. तसेच सोमवारी निवेदनासोबत प्रत्येक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, जर गुन्हा नोंदवून घेतला नाही तर आम्ही तेथून उठणार नाही, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.