लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जळगावातील कालिंका माता मंदिराजवळील स्टेट बँक शाखेत गुरुवारी भर दिवसा झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित पोलिस उपनिरीक्षकासह तीन जणांना अटक केली आहे. अवघ्या ४८ तासात या गुन्ह्याचा तपास लावत पोलिसांनी १६ लाखांच्या रकमेसह ३ कोटी ६० लाखांचे सोने संशयितांकडून जप्त केले आहे. अटक केलेल्या तिघा संशयितांमध्ये पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक ( रा. कर्जत ), त्याचे वडील रमेश राजाराम जासक ( रा. मन्यारखेडा ) व बँकेतील ऑफिस बॉय मनोज रमेश सूर्यवंशी यांचा समावेश आहे. घटनेतील संशयित आरोपी असलेला पोलिस उपनिरीक्षक हा ऑक्टोबर २०२१ पासून गैरहजर होता. अटकेनंतर त्याला बडतर्फ करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले.
अशी घडली होती घटना....
जळगावातील कालिंका माता मंदिर परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास हेल्मेट घातलेले दोन चोरटे मागच्या दरवाजातून बँकेमध्ये शिरले. त्यांनी ऑफीस बॉय मनोज सूर्यवंशी व सुरक्षारक्षक संजय बोखारे यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून मारहाण करीत दोघांच्या तोंडाला चिकट पट्ट्या लावून बांधून ठेवले. तर कॅश इन्चार्ज देवेंद्र नाईक व क्रेडिट कार्ड कर्मचारी नयन गिते यांना सुद्धा त्यांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत एका ठिकाणी बसवून ठेवले होते. नंतर बँक व्यवस्थापक राहुल मधुकर महाजन यांना मारहाण करून बंधक बनविले होते. त्यानंतर बँकेतून १७ लाख १० हजार ३७० रुपयांची रक्कम व ३ कोटी ६० लाख रुपयांचे सोने घेऊन चोरटे पसार झाले होते.
- घटनेनंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. पोलिसांनी बँक व्यवस्थापक आणि ऑफीस बॉय मनोज सूर्यवंशी यांना वेगवेगळी विचारपूस केली असता दोघांच्या जबाबामध्ये तफावत आढळल्याने मनोज सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
- पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा मेहुणा शंकर जासक व त्यांचे वडील रमेश जासक यांनी केल्याची कबुली दिली. चोरीतील सोन्याचे दागिने व पैसे पाहुणे शंकर जासक हे त्यांचे घरी कर्जत येथे घेऊन गेल्याची माहिती दिली.
- मन्यारखेडा येथून रमेश जासक याला तर कर्जत येथून शंकर जासक याला अटक केली.