शासनाचे आदेश : जळगाव जि.प.मध्ये पुन्हा त्याच पदावर नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कर्तव्यावर असताना अकोला येथील प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या सुधीर धिवरे यांचे निलंबन शासनाने मागे घेतले आहे. तसेच त्यांची पुन्हा जळगाव जिल्हा परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर प्रतिनियुक्ती केली आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत आदेश काढले आहेत. धिवरे हे जळगावला येण्यापूर्वी अकोला येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्तव्यावर होते. त्यानंतर त्यांची बदली होऊन गेल्यावर्षी ते जळगाव जिल्हा परिषदेत रुजू झाले होते. जळगावला असताना त्यांना अकोला येथील एका प्रकरणात दोषी ठरवून त्यांच्यावर गेल्यावर्षी १० नोव्हेंबर रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, निलंबनानंतर ते घरीच होते.
मात्र, शासनाने नुकतेच विभागीय चौकशीच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून धिवरे यांचे निलंबन मागे घेतले आहे व त्यांची पुन्हा जळगाव जिल्हा परिषदेत पूर्वीच्या पदावर नियुक्ती करून पूर्णवेळ काम करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने धिवरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले.