फोटो १७ एचएसके 06
कासोदा, ता. एरंडोल : येथील चौथ्या वर्गात शिकणारा साई अनिल ठाकरे (वय ११) हा बालक १६ रोजी घराशेजारीच असलेल्या नाल्याकाठावर बाभळीच्या झुडपात गळ्याला दोरीचा फास आवळलेल्या स्थितीत पालकांना आढळून आला.
या प्रकाराने गावात एकच खळबळ माजली असून, मृत्यूच्या कारणांबाबत मात्र वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
शाळांना सुट्या असल्याने १६ रोजी साई हा सुमारे दोन वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडला, बराच वेळ तो घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. सुमारे ५ वाजेदरम्यान तो घरासमोर नाल्याच्या काठावर बाभळीच्या झुडपात मिळून आला. परंतु एका बारीक फांदीला बांधलेल्या दोरीचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळलेल्या स्थितीत तो मिळून आला. घाबरलेल्या स्थितीत पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
साईच्या अशा मृत्यूबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. घातपात आहे की आणखी वेगळाच प्रकार आहे? याबाबत प्रत्येक जण आपापला कयास लावत आहे. साई हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. या अशा घटनेची वार्ता गावात वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर ठाकरे गल्लीत सारा गाव जमला होता. या मुलास येथील प्रा.आ.केंद्रात शवविच्छेदनासाठी नेले. या ठिकाणीही बरीच गर्दी जमली होती. पुढील तपास स.पो नि. रवींद्र जाधव व त्यांचे सहकारी करीत आहेत.