चाळीसगाव- शहरातील हरी गिरी बाबा नगरातील ६९ वर्षीय बेपत्ता असलेल्या वृद्धेचा मृतदेह चाळीसगाव-नागद रस्त्यावरील वाघडु शिवारातील शेतात मिळून आला. वृद्धेच्या मृत्युचे कारण समजून आले नाही. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार शहरातील हरी गिरी बाबा नगरातील मनोरुग्ण वृध्दा हिरकणबाई तुकाराम वाघ या २३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मतदान करण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघाल्या, त्यानंतर त्या घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. तपास न लागल्याने २४ रोजी त्यांच्या मुलाने त्या हरवल्याची नोंद चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला केली होती. त्यांचा शोध सुरु असतांनाच चाळीसगाव -नागद रोडरत वाघडू शिवारात असलेल्या गवताळा पार्क समोरील जवळपास ४ते ५ शेत ओलांडून असलेल्या शेतात हिरकण बाई वाघ यांचा मृतदेह २४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मिळून आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहेत.
बेपत्ता वृध्देचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 5:39 PM