जळगाव : नवीन वर्षात सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीसाठी बीआयएस ‘हॉलमार्किंग’ आवश्यक राहणार असून यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री राहणार आहे. तसे पाहता सुवर्णनगरीतील सोन्याबाबत विश्वासहार्यता असून त्यात यामुळे आणखी भर पडणार आहे.जळगावच्या केळीबरोबरच तेथील सोने- चांदीच्या व्यवसायाने भारतात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटीचा व्यवहार याला सोन्याच्या व्यवसायात अनन्यसाधारण महत्त्व असते. त्याच विश्वासावर जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे देशाच्या विविध भागातील ग्राहक सोने खरेदीसाठी येतात. भारताच्या कानाकोपऱ्यातील सांस्कृतिक परंपरा जोपासणारे अथवा आधुनिक पद्धतीचे दागिने पाहिजे असतील तर जळगावला पसंती दिली जाते. याला कारण म्हणजे येथील शुद्धताच आहे.आता या शुद्धतेच्या विश्वासार्हतेवर हॉलमार्किंगने आणखी भर पडणार आहे. नवीन वर्षात सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीसाठी बीआयएस ‘हॉलमार्किंग’ आवश्यक राहणार असून यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री राहणार आहे. केंद्र सरकारने प्रस्तावास मंजुरी दिली असून हॉलमार्किंग नवीन वर्षात लागू होणार आहे. सोने किती व इतर धातू किती, हे यामुळे कळणार आहे.सोने घेताना हॉलमार्किंग असलेलेच घेण्याचे आवाहन केले जात आहे. हॉलमार्क नसल्याने नंतर सोने मोडताना अडचणी येऊ शकतात. सध्या सोने विक्री करणारे, सराफांना हॉलमार्किंग ऐच्छिक आहे. सध्या केवळ ४० टक्के विक्री ‘हॉलमार्किंग’ने होते. मात्र आता ‘हॉलमार्किंग’ प्रत्येक सराफ व्यावसायिकाला आवश्यक राहणार आहे. ‘हॉलमार्किंग’ म्हणजे सोन्याच्या शुद्धतेची १०० टक्के खात्री राहणार आहे. हॉलमार्किंगमुळे विश्वासहार्यता आणखी भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.हॉलमार्किंग आवश्यक होणार असल्याने सरकारला त्यासाठी अगोदर हॉलमार्किंगसाठी केंद्र सुरू करावे, लागणार आहे. सुवर्ण अलंकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे केंद्र ठेवावे लागणार आहे. जिल्ह्याच्याच ठिकाणी केंद्र असल्यास तालुका व गावपातळीवरील सराफांना त्यांचे सोने संबंधित केंद्रावर आणावे लागेल. यात मोठा धोका संभवतो. त्यामुळे किमान तालुका पातळीवर हे केंद्र असावे, असा सूर या निमित्ताने उमटत आहे.जळगावातील सोने अगोदरच प्रसिद्ध असून त्याबाबत एक विश्वासार्हता आहे. त्यात आला हॉलमार्किंग आवश्यक असल्याने यामुळे येथील सोन्याच्या शुद्धतेबाबत आणखी विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी सराफ व्यावसायिकास परवाना घ्यावा लागणार असून शुद्ध सोन्याची विक्री होत नसल्याचे आढळल्यास हा परवाना रद्द होऊ शकतो. यासाठी अगोदर केंद्र सुरू करणे महत्त्वाचे आहे.-स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
सुवर्णनगरीच्या विश्वासार्हतेत पडमार भर, ‘हॉलमार्क’ने वाढणार सोन्याच्या शुद्धतेची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:56 AM