या लेखमालेत ‘मुलांशी वागायचे कसे?’ यासंदर्भात महत्त्वाचे काही मुद्दे आपण पाहिलेत. मुला-मुलातील भांडणे, मुलाचे अंगठा चोखणे, नख खाणे, अति चंचलता, विसराळूपणा इत्यादी अनेक मुद्दे पालक म्हणून पालकांना हाताळावे लागतात. त्याचप्रमाणे मतिमंद, कर्णबधिर, सेरेब्रल पाल्सी, अध्ययन अक्षम, एडीएचडी इ. प्रकारच्या विकलांग बालकांना सांभाळण्याचे पालकत्व काही जणांवर पडलेले असते. शिवाय एखाद्या बालकाला जर एखादा मोठा आजार जसे कर्करोग, हृदयविकार, मधुमेह वा मानसिक आजार इ. असेल तर त्यावेळी पालकत्वाच्या पद्धती आणखीनच बदलतात.काही दशकांपूर्वी पालकत्वाचे शिक्षण महत्त्वाचे वाटत नव्हते. आपले आई वडील आपल्याशी कसे वागत त्यावरुन पालकत्वाचे धडे घेतल्या जायचे.पण आमुलाग्र झालेले सामाजिक व कौटुंबिक बदल, नवनव्या भौतिक सुधारणा, त्यांचा वाढत चाललेला अतिरेकी वापर, मुलांपर्यंत अवेळी व अकाली पोहोचणारी अनावश्यक माहिती, मुलांचे कुटुंबातील अवाजवी वाढलेले महत्त्व, बालक केंद्री कुटुंबप्रणाली इत्यादींमुळे पालकत्वाचे पाठ बदलत चाललेत. खरे तर अशा संक्रमण काळी पालकत्वाची कला व शास्त्र शिकविणारी पाठशाळा गरजेची आहे. पण तशी वैज्ञानिक व सुयोग्य सुविधा उपलब्ध होणे एकंदरीत कठीणच आहे.शिवाय पालकत्व हे केवळ शास्त्रच नाही तर ते एक कौशल्य आहे. बालक-पालकाच्या व्यक्तित्व, स्वभाव, अभिवृत्ती इत्यादींनुसार ते बदलणारे आहे. शिवाय त्याला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक असे अनेकविध परिवेशही आहेत. हे सारे ध्यानात बाळगून पालकत्व जोपासत जायचे असते, विकसित करावयाचे असते.पालकाचे मुख्य कौशल्य बालकातील छुपे गुण बाहेर काढणे, त्याला पैलू पाडणे हेच असले तरी बालकास आपल्या सामाजिक-सांस्कृतिक-राष्ट्रीय-भाषिक वारशाची जोपासना करणे हे ही अपेक्षित असते. पालकत्वाची कौशल्ये पालकांनी बालकाच्या निकोप वाढीसाठीे आत्मसात करणे गरजेचे व आवश्यक आहे.काही पालकांच्या मनात अपराध भावना असते. आपण पालक म्हणून कमी पडतो, असे त्यांना सारखे वाटत असते. त्यांनी हे विसरायला नको की, आदर्श पालक होणे वा परफेक्ट पालक होणे कोणालाच शक्य नसते.प्रत्येकात काहीतरी उणिवा राहतातच. त्या स्वीकारायच्या असतात; आणि हो, पालक म्हणून आपल्याकडून काही चुका झाल्या तरी त्यावर जास्त विचार करत बसायचा नसतो. पालक म्हणून चुकण्याचा पालकांचा अधिकार असतोच की!कित्येक वेळा पालक म्हणून होणाऱ्या चुका वा आपल्यातील गुण आपल्या स्वत:ला जोखता येत नाहीत, कित्येक वेळा मुलांच्या शैक्षणिक, भावनिक, मानसिक समस्यात पालक म्हणून निर्णय घेणे कठीण वाटते वा व्यावसायिक शिक्षण निवडताना गोंधळ होतो अशावेळी तज्ज्ञ मनोचिकित्सकाचे सहाय्य घेणे कमीपणाचे नव्हे तर सुजाण पालकत्वाचे निदर्शक असते.जाता जाता हेही ध्यानात ठेवायला हवे की, कधीकधी काही पालक मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी ज्योतिषी, बुवा महाराज, संमोहन वा अंगठ्याच्या ठशाने व्यक्तित्व दर्शन इत्यादी अशास्त्रीय बाबींचा उपयोग करतात.मानसशास्त्रीय दृष्टीने पाहता ते चुकीचेच ठरते. बालक-पालक सुसंवादाची वीण ही कधीच शार्टकटची नसते तर ती काही विशिष्ट टप्प्यांनीच साधता येणारी असते, याची खूणगाठ पालकांनी बांधायलाच हवी.
सुजाण पालकत्व शास्त्रीय कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:07 AM