चहा घ्या.. स्वत: बनवलेल्या चहाचा पेला पुढे करत लोकमान्य टिळक हसले. प्रसन्न चित्ताने स्वामींनी पेला स्वीकारला. स्थळ बेलूर मठ, दक्षिणेश्वर, कलकत्ता. जायफळ, जायपत्री, वेलदोडे, लवंग यासोबत चक्क केशर घातलेल्या ह्या ‘मुघलाई’ चहाचा गंध आगळा वेगळा होता. स्वामी विवेकानंद हे चहाचे खरे दर्दी. त्यांच्या तोंडून वाहवा ऐकून लोकमान्य सुखावले. कारण ते स्वत:ही चहाचे दर्दी. साधा एक कप चहा प्यायल्यामुळे टिळकांच्या जीवनात प्रचंड वादळ निर्माण झाले होते. हे आज आपल्याला खरे वाटेल काय? ऑक्टोबर 1890 मध्ये ‘चर्च ऑफ होली नेम’ चर्च मधल्या सभेत पुण्यातले दिग्गज जमले होते. सभेनंतर लोकमान्य आणि महादेव गोविंद रानडे यांनी तेथे चहापान केले. झाले! एका वादळाची ही सुरुवात होती. ‘पुणे वैभव’ या वर्तमानपत्राने या सभेत चहापान केलेल्या 50 लोकांची यादी जाहीर केली. त्यांना धर्माबाहेर का काढू नये, असा प्रश्न उपस्थित केला. कर्मठ पुणेकरांनी त्यांना ‘बाटले’ असे जाहीर करत त्यांच्यावर बहिष्कार टाकला. प्रकरण थेट शंकराचार्यापयर्र्त गेले. टिळकांनी ‘मी काशीस प्रायश्चित्त घेतले आहे’, असे बचावात सांगितले. तरी दोन वर्षे त्यांना घरच्या कार्यासाठी पुरोहित मिळाला नाही म्हणे. स्वामींच्या बेलूर मठातही चहाचा वापर होत असे. कलकत्त्यातील कर्मठ ब्राrाणांना विवेकानंदांचे विचार जाचत होते. कारण धर्मातील अनिष्ठ रुढी व परंपरांवर ते उग्र भाष्य करत होते. विवेकवादी विचार मांडत होते. कर्मठांना मठातल्या चहापानाचे हे आयते कोलीत मिळाले. चहा पिणे म्हणजे पाप, बाटणे असा प्रचार होत होता. कर्मठांच्या प्रभावामुळे म्युनिसिपालीटीने बेलूर मठ म्हणजे खाजगी चहाबाग आहे, असे नमूद करून मठावरचे कर वाढवले. स्वामीजींनी याविरुद्ध न्यायालयात तक्रार केली व केस जिंकली. स्वामीजींनी जगभरातल्या वेगवेगळ्या चहापानाच्या पद्धतींबद्दल सविस्तर नोंदी त्यांच्या ‘परिव्राजक’ या पुस्तकात केल्या आहेत. ‘इंग्लंड आणि रशिया सोडल्यास पश्चिमेत इतरत्र चहापानाची फारशी पद्धत नाही.’ दूध किंवा लिंबू घातल्यास चहाची चव कशी बदलते याची नोंद त्यांनी केली आहे. स्वामींच्या कुटुंबात मात्र चहापानाची पद्धत होती. एकदा त्यांच्या घरात भंगारातून जुनी पुरानी किटली कोणीतरी आणली. कळकट किटलीतला भुसा काढला. तो काय किटली शुद्ध चांदीची होती. चहा हा आरोग्याला घातक नाही, असे मत स्वामीजींनी नोंदवले आहे. स्वामीजींच्या समकालीन अशी आणखी एक दिग्गज व्यक्ती कलकत्त्यात होती. त्यांनी तर कविता रचली होती. या तहानलेल्या आत्म्यानो, किटली उकळत आहे. याहो या, अहो सुरातालात उकळी फुटत आहे, ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून रवींद्रनाथ टागोर होते! रवींद्रनाथांना वेगळ्याच प्रकारचे चहा आवडत. होकी चा, हिरवा पेको, पांढरा चहा आणि काकडीच्या स्वादाचे मिश्रण असलेला त्यांना आवडणारा चहा आजच्या घडीला ‘रवींद्रनाथ चहा’ म्हणून विकला जातोत. एकदा जपानमध्ये टागोरांनी चक्क बशीत ओतून चहा प्यायला सुरुवात केली. त्यांचा मान राखत सारे जपानी बशीत ओतून चहा पिऊ लागले! सर्वसामान्य भारतीय मात्र चहाबद्दल अनभिज्ञ होते. ते थेट पहिले महायुद्ध संपेर्पयत.
स्वामी विवेकानंदजी, रवींद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 4:31 PM