जळगाव : जिल्हाभरात अद्यापही डेंग्यू नियंत्रणात आलेला नसताना आता वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा धोका बळावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे़ विषाणूजन्य आजारांचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत़ दरम्यान, मे महिन्यानंतर जिल्हाभरात एकही स्वाईन फ्लूचा रूग्ण नसल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे़सप्टेंबर, आॅक्टोबरचा हा काळ विषाणूसाठी पोषक असतो़ त्यातच यंदा पावसाने दिवाळीपर्यंत मुक्काम ठोकला होता़या पावसामुळे दमट, थंड, कधी कडक उन असे तिहेरी वातावरण अनुभवायला मिळत आहे़ या वातावरणात मध्यतंरी सतत पाऊस असल्याने उनच पडले नव्हते. त्यामुळे निर्माण झालेला ओलावा व थंडावा हे वातावरण आजार पसरविण्यासाठी धोकादायक असते़ त्यामुळे विषाणूंपासून होणाऱ्या आजारांचे रूग्ण वाढत असल्याचे चित्र आहे़ शहरातील खासगी रूग्णालये थंडी, ताप, खोकल्याच्या रूग्णांनी भरलेली आहेत़ स्वाईन फ्लू हा देखील संसर्गजन्य रोग असल्याने आताचे वातावरण त्याला अधिकच पोषक असल्याने हा आजारही बळावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे़ विषाणूजन्य आजारांसाठी हे वातावरण पोषक असल्याने यासाठी आधीच काळजी म्हणून आरोग्य विभागाने दक्षता घेतली असून सुटीच्या दिवशीही अधिकारी कर्मचारी कार्यालयात असून सर्व दवाखाने सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ दिलीप पोटोडे यांनी दिली़ शिवाय कुठल्या भागात असे संशयित रूग्ण आढळल्यास तत्काळ उपायोजना राबवा, अशा सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले़दरम्यान, सर्दी, ताप, खोकला व घसा यासारख्या आजारांनीही डोके वर काढले असून खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. अवकाळी पावसामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने आजार वाढत आहेत.या वातावरणात विषाणुजन्य आजारांची लागण अधिक होते़ ओलाव्यामुळे डासांचे प्रमाण अधिक होत असते़ खोकल्याचे रूग्णही अधिक आहेत़ त्यामुळे मच्छरांपासून सावधानता बाळगावी, तेलगट खाणे टाळावे, लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ़ परिक्षित बाविस्कर
डेंग्यूनंतर स्वाईन फ्लूचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 5:40 PM