लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांचा बळावर भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. मात्र, ५७ नगरसेवकांपैकी २७ नगरसेवक फोडले असले तरी भाजपचे दोन तृतीयांश म्हणजेच ३८ नगरसेवक फोडण्यात सेनेला अपयश आले. त्यामुळे भाजप मधून फुटलेल्या २७ नगरसेवकांवर भविष्यात अपात्रतेची टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच भाजपने देखील आता फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
सत्ताधारी पक्षातून फुटून नवीन गट तयार करण्यासाठी पक्षातील दोन तृतीयांश नगरसेवक फोडणे गरजेचे असते. मनपात सत्ताधारी भाजपचे एकूण ५७ नगरसेवक असल्याने नवीन गट स्थापन करण्यासाठी शिवसेनेला ३८ नगरसेवक फोडणे आवश्यक होते. त्याच दृष्टीने शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले होते. सुरुवातीला भाजपचे नऊ नगरसेवक शिवसेनेच्या हाती लागल्यानंतर, शिवसेनेकडून महापौरपदाची निवडणुकीसाठी लागणारे बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यात एमआयएम चे तीन नगरसेवक मिळाल्याने व भाजपचे विद्यमान सभागृहनेते ललित कोल्हे हे देखील आपल्या चार समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत दाखल झाल्याने, शिवसेनेकडून भाजपचा गट फोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सोमवार पर्यंत भाजपचे एकूण २५ नगरसेवक शिवसेनेच्या गोटात सामील झाले होते. भविष्यात फुटलेल्या नगरसेवकांना अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपचे ३८ नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र निवडणुकीपर्यंत शिवसेनेचे हे प्रयत्न काही अंशी अपूर्ण पडले आहेत. शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली असली तरी भविष्यात फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक नगरसेवकाशी संपर्क करून फोडण्याचा केला प्रयत्न
शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक आपल्या गोटात समाविष्ट करून घेतल्यानंतर, कुठल्या नगरसेवकांवर भविष्यात अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणून भाजपच्या इतर नगरसेवकांना देखील आपल्याकडे खेचण्यासाठी सेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. सेनेकडून बुधवारी रात्रीपर्यंत भाजपच्या अनेक नगरसेवकांशी संपर्क करण्यात आले. तसेच स्वतंत्र गटासाठी लागणारी ३८ नगरसेवकांचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेचा अनेक नेत्यांनीही यासाठी प्रयत्न केले. मात्र भाजपचे नगरसेवक नाशिकला रवाना झाल्याने भाजपने देखील गट स्थापन करण्या इतके नगरसेवक फुटू न देण्यासाठी चांगले प्रयत्न केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडे व मनपा आयुक्तांकडे करण्यात येणार तक्रार
भाजपच्या फुटलेला नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत भाजप कडून जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवतील. त्यानंतर विभागीय आयुक्त देखील याबाबतचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवण्याची शक्यता आहे. अपात्रतेची कारवाईची प्रक्रिया ही सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक चालण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप न्यायालयात जाण्याचा तयारीत असल्याची माहिती भाजपच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.