सुनील पाटील
गुन्ह्यांसोबत बंदोबस्ताची टांगती तलवार !
जिल्हा पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी सध्या गुन्ह्यांचा तपास व कोरोनाचा बंदोबस्त या दुहेरी संकटाचा सामना करीत आहेत. त्याशिवाय कायदा-सुव्यवस्था निर्माण झाल्यास तेथेही अतिरिक्त बंदोबस्त करावा लागत आहे. या काळात तर पोलीस स्वत: चे आयुष्यच विसरल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरु झाले असले तरी गुन्हे मात्र लाॅक झालेले नाहीत. गुन्हे घडू नये म्हणून पोलिसांची नियमित गस्त सुरू असून बीट मार्शल यांचीही धावपळ होताना दिसून येत आहे.या कर्मचाऱ्यांना कार्यक्षेत्रात सतत अलर्ट राहावे लागत आहे, त्याच सोबत घडलेले गुन्हे उघडकिस आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. ही दुहेरी कसरत करीत असताना आता कोरोनाचा बंदोबस्त मानगुटीवर बसलेला आहे. सध्या, चोरी,घरफोडी व सोनसाखळी लांबवण्याच्या घटना कमी असल्या तरी शरीराविरुद्धचे गुन्हे मात्र सातत्याने घडत आहेत. दोन दिवसापूर्वीच सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याची घटना घडली. या घटनेच्या तपासासाठी अपर पोलीस अधीक्षकापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जंगलात संशयितांच्या शोध घेताना सावद्याचे प्रभारी अधिकारी डी.डी हिंगोले यांना दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाला. दुसरीकडे स्वतःला दुसऱ्यालाही बाधा होऊ नये म्हणून स्वतःचा जीव घालून रस्त्यावर ड्यूटी करावी लागत आहे. गेल्यावर्षी कोरोना ड्युटी बजावताना पोलीस दलातील आठ जणांना जीव गमवावा लागला. आताही तशीच परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. अनेक कर्मचारी बाधीत होत आहेत त्यात तपास, बंदोबस व २४ तास ड्यूटी यामुळे कर्मचारी तणावात आहे. अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी लसीकरण सुरू केल्याने त्यामुळे दिलासा मिळाला आहे.