लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उड्डाण पदोन्नतीबाबत शासनाने दिलेल्या आदेशाविरोधात मनपा कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांनी शासनाच्या निर्णयाबाबत पाठपुरावा करून हे आदेश रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मनपा आयुक्तांनी शासनाच्या चुकीच्या आदेशाबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्याने मनपा कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.
उड्डाण पदोन्नतीबाबत शासनाने मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आदेशाविरोधात सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. मात्र, यामुळे मनपाच्या सर्वच प्रशासकीय कामांवर परिणाम होईल म्हणून यावर तोडगा काढण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजता मनपातील महापौरांच्या दालनात मनपा कर्मचाऱ्यांचा उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह मनपाचे उदय पाटील, अरविंद भोसले, राजेंद्र पाटील, विलास सोनवणी, सुशील साळुंखे, एस.एस.पाटील, सुनील भोळे यांच्यासह मनपाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निर्णयावर स्थगितीच नाही, हा निर्णय रद्द करू - पालकमंत्री
मनपा कर्मचाऱ्यांचा आंदोलनाच्या भूमिकेनंतर रविवारी माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली मनपा अधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. या निर्णयाबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनपा कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सांगितले. तसेच शासनाच्या निर्णयाबाबत नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करून, हा निर्णय केवळ स्थगितच नाही, तर रद्द करून आणू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांना दिले.
मनपातील पदाधिकारी मनपा कर्मचाऱ्यांचा पाठीशी
मनपा कर्मचाऱ्यांनी ३० ते ४० वर्षे मनपात सेवा बजावली असून, अशा प्रकारच्या आदेशानंतर या कर्मचाऱ्यांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच मनपातील सर्व पक्षांचे पदाधिकारी मनपा कर्मचाऱ्यांच्या बाजूने असल्याचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले. महापौरांनी मनपा कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
आयुक्तांची भूमिका स्पष्ट नाही
शासनाने उड्डाण पदोन्नतीबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. मात्र, याबाबत मनपा आयुक्तांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. मनपा कर्मचाऱ्यांनीदेखील याबाबत आयुक्तांची भेट घेतली. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांनादेखील आयुक्तांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. मनपा आयुक्तांच्या या भूमिकेविरोधात मनपा कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचे रविवारी झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांचा बैठकीत दिसून आले.