लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे महाविकास आघाडीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी तिरडी जाळण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. या वेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. याचा निषेध म्हणून भाजपतर्फे जिल्हा कार्यालय ते टॉवर चौक दरम्यान महाविकास आघाडी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टॉवर चौकात आल्यानंतर तिरडी पेटविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. या वेळी तिरडी पुन्हा मिळविण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याने पोलीस व त्यांच्यात ओढाताण झाली.
जनतेसाठी प्रश्न विचारणाऱ्यांना निलंबित करणे हा कुठला न्याय?
महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण असो अथवा ओबीसी आरक्षण असो या मुद्द्यांवर अपयशी ठरले आहे. सामान्य जनतेचे प्रश्न विचारणाऱ्या १२ आमदारांना निलंबित करणे हा कोणता न्याय आहे, असा सवाल भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या वेळी उपस्थित केला. पीठासन अधिकारी भास्कर जाधव हे पक्षपातीपणा करीत असून, महाविकास आघाडी सरकारचे काम करीत असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला.