फैजपूर : पंढरपूर वारीला विरोध करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी येथील प्रांत कार्यालयासमोर संत महंतांच्या उपस्थितीत ‘भजन आंदोलन’ करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतेले होते.
सकाळी ११ वाजता या भजन आंदोलनाला सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात यावेळी भजने म्हणण्यात आली. पंढरपूर वारीला विरोध, वारकऱ्यांवर होणारे अत्याचार, धर्म पताकांचा अपमान व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना झालेली नजर कैद याचा निषेध करण्यात या निवेदनाद्वारे करण्यात आला.
सदरचे भजन आंदोलन विश्व हिंदू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाद्वारे पुकारण्यात आले होते. यावेळी दिलेल्या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश होता. त्यात नजर कैद केलेल्या वारकऱ्यांना सन्मानाने मुक्त करावे, त्यांच्यावरील दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्यावे. विविध धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध दूर करावेत, किमान पन्नास टक्के उपस्थितीला मान्यता द्यावी, वारकऱ्यांना देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल मुख्यमंत्र्यांनी तत्काळ माफी मागावी, नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेसाठी पंढरपुरात येऊ नये, या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज, शास्त्री भक्ती किशोर दास महाराज, ह.भ.प. दुर्गादास महाराज, हभप धनराज महाराज अंजाळेकर, मसाका संचालक तथा डिगंबर महाराज, मठ पंढरपूरचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, पुंडलिक महाराज चिखलीकर, माजी नगराध्यक्ष नीलेश राणे, भाजप शहराध्यक्ष अनंता नेहते, विश्व हिंदू परिषदेचे योगेश भंगाळे, ॲड.कालिदास ठाकूर, शेखर पाटील, भास्कर बोंडे, गणेश पाटील, शेखर चौधरी, काशिनाथ वारके, नितीन नेमाडे, गोटू भारंबे, मसाका कामगार युनियनचे अध्यक्ष किरण चौधरी व भजनी मंडळ यांची उपस्थिती होती. सदरचे निवेदन प्रांत कार्यालयातील अधिकारी रशीद तडवी यांनी स्वीकारले.