अमळनेर : जिल्ह्यात १ जूनपर्यंत संचारबंदी व विशेष निर्बंध लागू असूनही विविध कार्यक्रम, आंदोलने, राजकीय पक्षांची निवेदने देणे या माध्यमातून सर्रास नियमांचा भंग होत आहे. याबाबी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यात १ जून सकाळी ७ पर्यंत निर्बंध लागू असून, संचारबंदीचेदेखील आदेश आहेत. असे असतानाही सोशल मीडिया, यू- ट्यूब चॅनल आणि वृत्तपत्रातील बातम्यांवरून जिल्ह्यात विवाह समारंभ, राजकीय बैठका, विविध शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलने, निवेदने, विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन, सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण, समाजिक-धार्मिक आदी कार्यक्रम होताना दिसत आहे. त्यामुळे होणाऱ्या गर्दीतून संसर्ग वाढून तिसऱ्या लाटेची शक्यता बळावली आहे. एकीकडे प्रशासन सामान्य जनतेवर, फेरीवाले, विक्रेते, दुकानदार यांच्यावर कारवाया करत असताना शासकीय-निमशासकीय कर्मचारी तथा राजकीय व्यक्ती अनेकदा मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वृत्तपत्र आणि सोशल मीडियावरील कार्यक्रमांतील फोटो हेच पुरावे पाहून भादंवि कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, असेही माजी आमदार साहेबराव पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.