जळगाव : लग्न सोहळ्यांवर कारवाई करताना वधू-वर पित्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये मंगल कार्यालय, टेण्ट हाऊसवर कारवाई केली जात आहे. हा आमच्यावर अन्याय असून केवळ नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी टेण्ट ॲण्ड डेकोरेशन असोसिएशनने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या आठ ते १० दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना लग्नसोहळ्यांमध्ये मोठी गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याला आळा बसण्यासाठी वधू-वरांचे कुटुंबीय व मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात आहे. या संदर्भात टेण्ट ॲण्ड डेकोरेशन असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, करण्यात येणारी ही कारवाई म्हणजे टेण्ट ॲण्ड डेकोरेशन व्यावसायिकांवर अन्याय आहे.
लग्न सोहळ्यांसाठी महापालिकेकडून परवागी घेताना वधू-वर पिता हे केवळ ५० जणांचीच परवानगी घेतात. मात्र ऐन लग्नाच्या वेळी प्रतिष्ठेची बाब म्हणून ५०पेक्षा जास्त जणांना निमंत्रण देतात. प्रत्यक्षात मंगल कार्यालय व टेण्ट हाऊस, डेकोरेटर्स यांच्याकडे बुकिंग करताना वधू-वर पक्षाकडून लेखी स्वरुपात लिहून घेतले जाते व नंतर मंगल कार्यालय ताब्यात दिले जाते. त्यांनतर तेथे लग्न समारंभ व इतर कार्यक्रम पार पडतात. या दरम्यान वधू-वर पक्षांकडून नियमांचे उल्लंघन होते, त्यास मंगल कार्यालय व टेण्ट हाऊस मालक जबाबदार नसतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जावी, मंगल कार्यालय व टेण्ट हाऊस मालकांवरही कारवाई करणे अन्याय असून या मालकांवर कारवाई न करण्याची मागणी टेण्ट ॲण्ड डेकोरेशन असोसिएशने केली आहे.
निवेदनावर टेण्ट ॲण्ड डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष प्रितीश चोरडिया, सचिव सुनील लुल्ला, खजिनदार अजय अग्रवाल यांच्या स्वाक्षरी आहेत.