जळगाव : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याच्या वातावरणात भीती व काळजी या दोन्ही गोष्टींना थारा न दिल्याने गेल्या १३ दिवसात कुटुंबातील एका व्यक्तीकडून संपूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून १३ दिवसात १३ कुटुंबांना कोरोनाची लागण झाली आहे. हे भयावह चित्र शहरातील असून गंभीर बाब म्हणजे शहरातील अगदी वेगवेगळ्या भागातील हे कुटुंब आहे.
मार्च ते सप्टेंबरदरम्यान असलेली कोरोनाची दहशत संख्या कमी झाली. त्यात नागरिकांनी नियम पाळण्यासही दुय्यम स्थान दिल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच फज्जा, स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष, अशा बाबी सर्रास निदर्शनास येत असून हे सर्व कोरोनाला निमंत्रण देत आहेत. कोरोनाचा आलेख खाली आला मात्र, तो पूर्ण खाली जाण्याऐवजी स्थिर राहत असल्याचे नियमित तपासणी अहवालांवरून समोर येत आहे.
एकाच कुटुंबातील सदस्य बाधित
१ फेब्रुवारी : खोटे नगर ३
२ फेब्रवारी : शिवराम नगर २,
४ फेब्रुवारी : मोहननर ७, भिकमचंद जैन नगर २
७ फेब्रुवारी: शिवकॉलनी ८, सरस्वतीला नगर २,
८ फेब्रुवारी : शाहू नगर ३,
९ फेब्रुवारी : रायसोनीनगर ३, सेंट्रल बँक कॉलनी ४, अर्जुन नगर ३,
१० फेब्रुवारीला : कोल्हेनगर ३
११ फेब्रुवारीला : हरिविठ्ठल नगर ३, सरस्वतीनगर ५, बळीरामपेठ २
१२ रोजी पिंप्राळा ३, ११ रोजी हिरा शिवा कॉलनी ३,
ही कारणे....
१ कुटुंबात पूर्वीसारखी काळजी घेतली न जाणे
२ सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असली तरी कुटुंबात मिसळून राहणे,
३ लक्षणे जाणवत असली तरी तपासणी न करणे
४ अन्य आजारांचेच उपचार घेणे.
५ लक्षणे असतानाही गांभीर्याने न घेणे, विलगीकरणाबाबत दक्षता न घेणे
कोट
गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीपासून कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप, चव न येणे आदी लक्षणे असल्यास तातडीने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तपासणी करून घ्यावी, घरात कुटुंबापासून विलग राहणे, मास्क लावणे, घरातील कुठल्याही साहित्याला हात लावण्याआधी ते स्वच्छ धुणे या बाबी पाळल्या तरच आपण कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. - डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा