जळगाव : कोरोनाच्या संकटातही एकमेकांवर आरोप होत असल्याने सध्या केंद्र सरकार व राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा फोटो ट्विट करीत मुख्यमंत्री कसा असावा याचा आदर्श घ्या, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
सध्या कोरोनाचे संकट उभे असले तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, राज्य सरकार केंद्र सरकारवर आरोप करीत आहे, तर भाजपच्या मंडळींकडून राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. यामध्ये राज्य सरकारने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी राज्य सरकारवर टीका करीत म्हटले आहे की, केंद्र सरकारने काय-काय मदत केली, त्याची श्वेतपत्रिका काढावी, यामुळे सर्व काही समोर येईल. सोबतच आमदार भोळे यांनी मनोहर पर्रीकर यांचा ऑक्सिजन सुरू असतानाही काम करीत असल्याचा फोटो ट्विट करीत मुख्यमंत्री कसा असावा, असे म्हणत ज्याला आदर्श घ्यायचा त्याने तो घ्यावा, असा सल्ला दिला.
आपल्या ट्विटमध्ये ''डोळे भरून येणारच, प्रकृती नाजूक असतानाही काम करायचे असते. प्रजेसाठी मुख्यमंत्री असतो हे समजून घ्यायचं असतं. घरी बसून प्रकृती सांभाळणारा मुख्यमंत्री जनतेला नको असतो. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा समाजसेवी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर'', असे ट्विट आमदार भोळे यांनी केले आहे.