लोकमत न्यूज नेटवर्क
जळगावा : जिल्ह्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलित करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश खा. रक्षा खडसे यांनी गुरुवारी दिले.
येथील जिल्हा नियोजन भवनात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खा. खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे उपस्थित होते.
खा. खडसे पुढे म्हणाल्या, सध्या महामार्गाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सूचनाफलक ठिकठिकाणी लावावे. ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात, अशा ठिकाणांची माहिती तातडीने संकलित करून तेथे आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. घोडसगाव येथे समांतर रस्ते तयार करण्याच्या सूचना देऊन महामार्गाच्या कामांची गती वाढविण्याचेही निर्देश दिले आहेत. बहुतांश अपघात हे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याचे गांभीर्य लक्षात न घेतल्याने होत असतात. यात दुचाकीचालकांची संख्या जास्त असल्याने दुचाकीला आरसा आवश्यक करावा. यावेळी खडसे यांनी जळगाव-चिखली, जळगाव-धुळे, जळगाव-औरंगाबाद, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती सर्व संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली.
बांभोरी पुलाला पर्यायी पूल द्या - पालकमंत्री
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उपकार्यालय सुरु करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. तसेच रस्त्यांच्या कामांमध्ये जे कंत्राटदार विहित कालावधीत कामे पूर्ण करणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यातील महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या प्रस्तावांचाही आढावा त्यांनी घेतला. महामार्गावर प्रमुख गावांजवळ बसथांबा असावा, भविष्यातील अडचणी लक्षात घेता गिरणा नदीवरील बांभोरी पुलाला पर्यायी पूल उभारावा. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ ॲम्बुलन्स पोहोचेल याचीही काळजी घ्यावी, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
आ. संजय सावकारे यांनी सांगितले की,‘ प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची तपासणी व्हावी. रस्त्यांवर वाहनाच्या गतीबाबतचे फलक लावावे, भुसावळ येथील रुग्णालयात ऑक्सिजन टँक, पोस्टमार्टम रुम उभारावी, रुग्णालयाला वॉलकम्पाऊंड करण्याची मागणी आ. सावकारे यांनी केली तसेच आमदार निधीतून एक ॲम्बुलन्सही देण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली.