लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला किडनी विका; पण शहरातील रस्ते बनवा, अशा आशयाचे पत्र दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी मनपाला अजबच पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, गुप्ता यांच्या निवेदनात नमूद बाबींच्या अनुषंगाने नियमानुसार तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी आणि याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार यांना आपल्या स्तरावरूनच कळवण्यात यावे. हे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी पाठवले आहे.
जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यात मनपा प्रत्येक कामासाठी निधी नसल्याचे उत्तर देत असल्याने सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत माझी किडनी विका आणि आलेल्या पैशातूून शहरातील रस्ते बनवा, असे निवेदन दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने हे अजब पत्र मनपाला पाठवले आहे. आता मनपा यावर नेमकी काय कार्यवाही करते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.