जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देता येते. त्यासाठी बारावीप्रमाणेच आता दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचेही अर्ज सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारले जाणार आहेत. मार्च २०२४ परीक्षेपासून ही सुविधा लागू झाली आहे.
दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संपर्क केंद्रामार्फत नोंदणी करावी लागत होती. आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. बारावीचे खासगी विद्यार्थी सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज भरतात, त्याच धर्तीवर दहावीचे खासगी विद्यार्थी नोंदणीचे अर्ज सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतून भरू शकणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता पाचवी उत्तीर्ण असून, अर्ज ऑनलाइन आहे.
यादीतून शाळा, कॉलेज निवडा
नाव नोंदणी करताना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्याला त्याचा पत्ता व त्याने निवडलेले माध्यम यानुसार शाळांची यादी ऑनलाइन दिसेल. त्यामधील एका शाळेची निवड त्याने करायची आहे.
दिव्यांग असाल तर प्रमाणपत्र द्या
दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरीत्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करायची आहे. ही कागदपत्रे द्या..
शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय पत्र व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो. ऑनलाइन अर्ज भरताना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. विद्यार्थ्याचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी द्यायचा आहे.
असा मिळवा अर्ज
अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रत विद्यार्थ्याला ई-मेलवर मिळेल. त्याची प्रिंटआऊट, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र दोन प्रतीत शाळा / महाविद्यालयात जमा करायचे आहे.
ही चूक दुरुस्त होईल; पण सशुल्क...
नाव नोंदणी अर्जातील माध्यम, शाखा, शाळा / महाविद्यालयाचे नाव व इतर दुरुस्ती करायची असेल तर विद्यार्थ्याला पुन्हा नावनोंदणी शुल्क द्यावे लागणार आहे. असे आहे वेळापत्रक- विद्यार्थ्यांची नावनोंदणी, ऑनलाइन शुल्क - ११ सप्टेंबरपर्यंत- अर्ज व इतर कागदपत्रे शाळेत जमा करणे - १३ सप्टेंबरपर्यंत - शाळांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे मंडळात देणे - दि.१५ सप्टेंबर
पण, एवढा गॅप असावा लागतो
नववीनंतर लागलीच पुढील शैक्षणिक वर्षात दहावीसाठी १७ नंबरचा अर्ज भरता येत नाही. नववीनंतर गॅप असावी लागते. हे अर्ज भरलेल्यांनी शाळेत नियमित येण्याची गरज नसते, अशी माहिती नंदिनीबाई विद्यालयाच्या प्राचार्या चारुलता पाटील यांनी दिली. विद्यार्थी दरवर्षी शाळेतून १७ नंबरचा अर्ज भरतात. दहावी व बारावीची परीक्षा आधी दिली नसेल तर त्यांना १७ नंबरचा अर्ज भरता येतो. नववीनंतर किमान दोन वर्षांची गॅप असावी लागते, अशी माहिती श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या (कुसुंबा) प्राचार्या प्रतीक्षा पाटील यांनी दिली.