आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,३० : तालुक्यातील कुसुंबा येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी किशोर शिवाजी पाटील या चालकाच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून कपाटातील १३ हजार रुपये रोख व दागिने असा ६५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, किशोर पाटील हा तरुण खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. कुसुंबा येथे आई सुमनबाई व पत्नी भावना यांच्यासह राहायला आहे. २० आॅक्टोबर रोजी पत्नी भाऊबीजसाठी वावडदा, ता.जळगाव येथे माहेरी गेली होती तर दुसºया दिवशी किशोर व आई असे दोघं जण जळगावात गणेश कॉलनीत मामाकडे गेलेले होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसापासून घर बंदच होते. सोमवारी सकाळी शेजारी मामाकडे असताना शेजारच्या लोकांनी घर उघडे असून दरवाजाचे कुलुप तुटले असल्याची माहिती दिली. त्यानुसार तातडीने किशोर व मामाचा मुलगा किरण व मामा नामदेव देवराम पाटील आदींनी कुसुंबा येथे जाऊन घर गाठले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता तर कपाट उघडे होते व लॉकर तुटलेले होते.
असा गेला मुद्देमाल
लॉकरमध्ये ठेवलेले २० हजार रुपये किमतीची १२ ग्रॅमची सोन्याची साखळी, २४ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅमचे कानातील कॉप व ४ ग्रॅमची अंगठी, १० हजार रुपये किमतीची ५ गॅमची अंगठी व १३ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. अन्य किरकोळ वस्तुही चोरीस गेलेल्या आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर किशोर पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत व अन्य सहकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकानेही घटनास्थळाची पाहणी करुन नमुने घेतले.